“बाबासाहेबांचे नाव अनावधानाने राहिले असेल, पण आता एवढे कशासाठी?”; गिरीश महाजनांचा थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 11:05 IST2026-01-27T11:05:51+5:302026-01-27T11:05:58+5:30
Girish Mahajan News: मला खूप वाईट वाटले. मी संघाच्या मुशीत वाढलो आहे. आता अनवधानाने राहिले असेल नाव घेणे, पण एवढे कशासाठी? अशी प्रश्न गिरीश महाजन यांनी केला.

“बाबासाहेबांचे नाव अनावधानाने राहिले असेल, पण आता एवढे कशासाठी?”; गिरीश महाजनांचा थेट सवाल
Girish Mahajan News: मी दिलगिरी व्यक्त केली. बाबासाहेब यांचे विचार जपणारा आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. मला माहिती नाही की, त्या भगिनी कोण आहेत? मी गावात पंगत देतो, त्यांच्यासोबत जेवणाला बसतो, जामनेरमध्ये सर्व नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्य निवडून येतात, यात सर्व समाजाचा वाटा आहे. आम्ही शाम बडोदे यांना जळगावातून तिकीट दिले, हे आमचे सर्वसमावेशक राजकारण आहे, असे भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्यावरून सुरू असलेल्या टीकेवर बोलताना गिरीश महाजन यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.
बाबासाहेबांसाठी सरकारी नोकरी पणाला, मंत्री गिरीश महाजनांना आव्हान देणाऱ्या माधवी जाधव कोण?
देशात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. अशातच नाशिकमध्ये मात्र खळबळजनक प्रकार घडल्याचे समोर आले. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजारोहण केले. पंरतु, आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्यावरून वन विभागातील माधवी जाधव या महिला कर्मचाऱ्याने थेट जाब विचारला. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपही झाले. विरोधकांनी या घटनेनंतर भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठवली. यावर गिरीश महाजन यांनी सविस्तर भाष्य केले.
संघाच्या मुशीत वाढलो, ॲट्रॉसिटी दाखल करा म्हणता, पण कशासाठी?
मला खूप वाईट वाटले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये मी पुढाकार घेतो. नेते येतात हार घालून निघून जातात. पण मी आमच्या गावात, तालुक्यात जयंतीमध्ये असतो. मी चाळीस वर्षांत एकदाही असे केले नाही. मातंग समाजासाठी, वाल्मिकी समाजासाठी जातो, लग्नात जातो. मी संघाच्या मुशीत वाढलो आहे. जामनेरमध्ये बाबासाहेबांचा मोठा पुतळा उभा केला. आता अनवधानाने राहिले असेल पण एवढे कशासाठी? मी चाळीस वर्षात अंगात निळा शर्ट घातला नाही असे कधी झाले का? ॲट्रॉसिटी दाखल करा म्हणताय, पण कशासाठी? अशी विचारणा गिरीश महाजन यांनी केली. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जपणे हा भाजपचा संस्कार आहे. आंबेडकरी विचारांचा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः सलग ४० वर्षांपासून दरवर्षी आंबेडकर जयंतीला ट्रॅक्टर चालवतो, लेझीम खेळतो. आंबेडकरी विचार आमच्या केवळ भाषणात नाही, तर प्रत्यक्ष कृतीतही आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, गिरीश महाजन यांनी बाबासाहेबांचा जो अपमान केला आहे, तो भरून निघण्यासारखा नाही. कुंभमेळ्यात नदीत आंघोळ केली, तरी त्यांचे पाप धुतले जाणार नाही. संविधानाच्या मार्गानेच त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल होईल, तेव्हाच ते पाप धुतले जाईल. गिरीश महाजनांवर अॅट्रॉसिटी दाखल करावी. अन्यथा याच ठिकाणी मी उपोषण सुरू करणार आहे, असा थेट इशारा माधवी जाधव यांनी दिला आहे.