उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 17:12 IST2025-07-20T17:07:32+5:302025-07-20T17:12:39+5:30
BJP Girish Mahajan News: केवळ खासदारकीसाठी राज्यसभेवर घेतले नसून, उज्ज्वल निकम यांना मोदी सरकारमध्ये मंत्रीपद मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे म्हटले जात आहे.

उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
BJP Girish Mahajan News: मुंबईत २६ नोव्हेंबर १९९३ रोजीच्या दहशतवादी हल्ला खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून गाजलेले ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रुंगला, केरळ भाजपचे नेते सी. सदानंदन मास्टर आणि इतिहासाच्या अभ्यासक डॉ. मीनाक्षी जैन यांची अलीकडेच राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती झाली. यानंतर आता उज्ज्वल निकम यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याबाबत भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली.
गिरीश महाजन पत्रकारांशी बोलत होते. उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा असल्याबाबत गिरीश महाजन यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्याबाबत त्यांचे अभिनंदन आहे. मी त्यांना लगेच फोनही केला होता. लोकसभेला थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला, याचे दुःख आम्हा सर्वांनाच होते. उज्ज्वल निकम माझे चांगले मित्र आहेत. ते राज्यसभेवर गेले आहेत. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवरील नियुक्ती केवळ खासदारकीसाठी नसेल, ते मोठे वकील आहेत, त्यांनी खूप चांगले काम राज्यात आणि देशात केलेले आहे. दहशतवादासंदर्भातील केसेस, देशद्रोह्यांबाबतच्या केसेस ते लढले आहेत. त्यामुळे होऊ शकते. काही अशक्य नाही, असे सूचक विधान गिरीश महाजन केले.
उज्ज्वल निकम इन अन् रक्षा खडसे आउट होणार?
उज्ज्वल निकम यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले, तर एका जिल्ह्यात दोन केंद्रीय मंत्रीपद येईल, अशा परिस्थितीत रक्षा खडसे यांच्या मंत्रिपदाला काही धोका निर्माण होऊ शकेल का, असा सवाल गिरीश महाजन यांना करण्यात आला. यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, मला तसे वाटत नाही. आम्ही पण भाजपाचे दोन लोक इथे आहोत. एकेका राज्याचे तीन-चार मंत्री आहेत. कोणता धोका असेल, असे मला वाटत नाही. शेवटी पक्षश्रेष्ठी आहेत. कुणाला मंत्री करायचे, कुणाला करायचे नाही. कुणाला काढायचे, कुणाला ठेवायचे, ते ठरवतील, असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यसभेवर नियुक्त चारही सदस्यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व सदस्यांचा व त्यांच्या योगदानाचा गौरव केला आहे. विशेषत: निकम यांचा त्यांनी विशेष गौरव केला. नामांकित वकील अशी ओळख असलेले ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांत सरकारची बाजू मांडून आरोपींना शिक्षा मिळवून दिली आहे. १९९३चा मुंबई बॉम्बस्फोट खटला, गुलशन कुमार खून खटला, खैरलांजी हत्याकांड, प्रमोद महाजन खून प्रकरण या खटल्यांत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाने त्यांना उत्तर मुंबईमधून उमेदवारी दिली होती. परंतु, त्यांना यश आले नव्हते.