भाजपाने स्वबळाचा अट्टाहास सोडला !

By Admin | Updated: July 17, 2014 02:05 IST2014-07-17T02:05:46+5:302014-07-17T02:05:46+5:30

लोकसभा निवडणुकीनंतर स्वबळाची भाषा करीत मुख्यमंत्री पदावर दावा सांगणाऱ्या भाजपाला आज अचानक शिवसेनेच्या थोरलेपणाचा साक्षात्कार झाला

BJP left the self-confidence! | भाजपाने स्वबळाचा अट्टाहास सोडला !

भाजपाने स्वबळाचा अट्टाहास सोडला !

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर स्वबळाची भाषा करीत मुख्यमंत्री पदावर दावा सांगणाऱ्या भाजपाला आज अचानक शिवसेनेच्या थोरलेपणाचा साक्षात्कार झाला. राज्यात शिवसेनाच मोठा भाऊ असेल, असे सांगत ‘सन्मान झाला पाहिजे’ एवढी माफक अपेक्षा व्यक्त केली गेली. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी कानउघाडणी केल्यानंतर राज्यातील भाजपा नेत्यांची भाषा बदलली असल्याचे दिसून आले.
भाजपाच्या प्रदेश कोअर कमिटीने आज मुंबई, ठाण्यासह कोकणातील जिल्हा कोअर कमिट्यांशी संघटनात्मक तयारीबाबत चर्चा केली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले, की भाजपा युती तोडणार नाही. भाजपा स्वबळावर निवडणूक लढण्याच्या प्रयत्नात आहे, हा प्रचार खोटा आहे. शिवसेनेसह महायुतीतील अन्य घटक पक्षांशी चर्चा करून जागावाटप निश्चित झाल्यावर येत्या १५ आॅगस्टपर्यंत विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर
करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे, असे फडणवीस म्हणाले.
एकीकडे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी युती ताडण्याची मागणी करीत स्वबळावर निवडणुका लढविण्याची मागणी केली. इतके दिवस या मागणीला हवा देणाऱ्या प्रदेश नेत्यांनी आज मात्र घूमजाव केला. स्वबळावर नव्हे, तर महायुती म्हणूनच निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे संघटनात्मक ताकद वाढवून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याकडे लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. (प्रतिनिधी)

Web Title: BJP left the self-confidence!