राज्यातील सरकार खंडणीखोरांचं, गुन्हेगारांचं हे सिद्ध करण्याचा विडाच उचललाय; भाजपची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 19:48 IST2021-03-20T19:46:00+5:302021-03-20T19:48:11+5:30
Prambir Singh : गृहमंत्र्यांनी वाझे यांना दरमहा १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे केला

राज्यातील सरकार खंडणीखोरांचं, गुन्हेगारांचं हे सिद्ध करण्याचा विडाच उचललाय; भाजपची टीका
मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग नाराज असून, पदभार न घेताच ते रजेवर गेले आहेत. अचानक त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आल्यामुळे नाराज झालेले परमबीर सिंग हे स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या पवित्र्यात असल्याचं समजते. दरम्यान, त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मोठा आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते असा मोठा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हे आरोप केले आहेत. यानंतर भाजपचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
"गृहमंत्र्यांनी हप्ता गोळा करायचं टार्गेट दिल होत, परमवीर सिंग यांचं धक्कादायक गंभीर पत्र. हे राज्यातील सरकार खंडणीखोरांच, गुन्हेगारांचे हे सिद्ध करण्याच विडाच उचलला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीनं बाजूला व्हायला हवे अथवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना काढायला हवे," अशी प्रतिक्रिया केशव उपाध्ये यांनी दिली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.
गृहमंत्र्यांनी हप्ता गोळा करायचं टार्गेट दिल होत, परमवीर सिॅग यांचे धक्कादायक गंभीर पत्र. हे राज्यातील सरकार खंडणीखोरांच, गुन्हेगारांचे हे सिध्द करण्याच विडाच उचलला आहे. @AnilDeshmukhNCP यांनी तातडीने बाजूला व्हायला हवे अथवा @OfficeofUT यांनी त्यांना काढायला हवे.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) March 20, 2021
काय आहेत पत्रातील मुद्दे?
मार्च महिन्याच्या मध्यात वर्षा बंगल्यावर मी तुमची भेट घेतली. त्या ठिकाणी अँटिलियाच्या केसबद्दल पूर्ण माहिती देत होतो. त्याचवेळी मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दल तुम्हाला कल्पना दिली. इतकंच नाही तर अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चुकीच्या कृतीबद्दलही माहिती दिली. परंतु त्या ठिकाणी असलेल्या अन्य मंत्र्यांना याची पूर्वीपासूनच कल्पना असल्याचं निदर्शनास आल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं.
सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्स युनिट हेड करत होते. गेल्या अनेक महिन्यात देशमुख यांनी वाझे यांना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलावलं आणि दरमहा १०० कोटी जमा करण्यास सांगितली. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी वाझेंना हे सांगितलं. त्यावेळी त्यांचे वैयक्तीक सेक्रेटरी पलांडे आणि घरातील काही स्टाफदेखील हजर होते. हे पैसे गोळा करण्यासाठी काय करायचं हेदेखील त्यांनी वाझेंना सांगितलं. मुंबईत १७५० बार आणि रेस्तराँ आहेत त्यातल्या प्रत्येकाकडून दोन तीन लाख गोळा केले तरीही महिन्याला चाळीस पन्नास कोटी होतील. राहिलेली अन्य रक्कम इतर ठिकाणाहून गोळा करता येईल, असंही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.