५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 11:43 IST2025-11-22T11:24:13+5:302025-11-22T11:43:10+5:30
Nagarparishad Election BJP: वाशिममध्ये भाजपकडून तिकीट कापलेल्या उमेदवाराची नाराजी थेट बॅनरवर झळकल्याचे पाहायला मिळाले.

५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश
Washim Nagarparishad Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी वाटपावरून पक्षांतर्गत वाद आणि नाराजीनाट्य सुरू असताना, वाशिम जिल्ह्यातील एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. वाशिम नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर, पक्षाचे स्थानिक पदाधिकारी धनंजय घुगे यांनी कोणतीही तक्रार न करता किंवा बंडखोरी न करता एक अत्यंत अनपेक्षित पाऊल उचलले आहे. उमेदवारी नाकारल्याबद्दल नाराज न होता, त्यांनी चक्क पक्षाचे आभार मानणारे बॅनर लावले आहेत, ज्याचा मजकूर वाचून अनेकांना आश्चर्य वाटले.
धनंजय घुगे यांना वाशिम नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी मिळालेली नाही. उमेदवारी कापल्यानंतर सामान्यतः संबंधित पदाधिकारी पक्ष सोडण्याच्या किंवा विरोधी काम करण्याच्या भूमिकेत असतो, परंतु घुगे यांनी अगदी उलट पाऊल उचलले. त्यांनी आपल्या प्रभागात पक्षाचे आभार मानणारे मोठे बॅनर लावले आहेत, ज्यावर स्पष्टपणे उमेदवारी कापणाऱ्यांचे आभार मानतो असे म्हटलं आहे.
"पुन्हा एकदा माझी उमेदवारी कापणाऱ्यांचे धन्यवाद. कारण.. २०१४ विधानसभा निवडणुकीत उमेदवारी डावलली, २०१६ नगर पालिकेची उमेदवारी डावलली, २०१९ विधानसभा निवडणुकीत उमेदवारी डावलली, २०२४ विधानसभा निवडणुकीत उमेदवारी डावलली. आणि आता पुन्हा २०२५ नगरपरिषद निवडणुकीत उमेद्वारी कापली. तरीही. 'मी भाजपाचा एकनिष्ठ कार्यकती आहे आणि कायम राहील. पद व सत्तेसाठी हपापलेला नाही हे दर्शवून देण्याची संधी मला उपलब्ध करून दिल्याबद्दल पुनश्च धन्यवाद !," असं या बॅनरवर लिहीलं आहे.
आपण हे बॅनर का लावले, याबद्दल घुगे यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांच्या प्रभागात त्यांच्याबद्दल अनेक अफवा पसरू लागल्या होत्या. "पक्षाने मला उमेदवारी नाकारली आणि ती नाकारल्यामुळे माझ्या प्रभागात अशा अफवा सुरू झाल्या की मी पक्षांतर करेल किंवा पक्षविरोधी काम करेल. तर, ते तसं काही नाहीये, हे स्पष्ट करण्यासाठी मी ते बॅनर लावलं, असं घुगे यांनी म्हटलं. या बॅनरवरुन त्यांनी आपण पक्ष सोडणार नाही किंवा पक्षाच्या विरोधात काम करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
भाजपकडून एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट
घराणेशाहीवरुन टीका करणाऱ्या भाजपानेच एकाच कुटुंबातील ६ जणांना उमेदवारी देण्याचा अजब प्रकार केल्याचं समोर आले आहे. नांदेडच्या लोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने एकाच कुटुंबातील ६ जणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. लोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्याशिवाय नगरसेवकपदासाठी त्यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सूर्यवंशी यासोबतच मेव्हुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रिना अमोल व्यवहारे या सर्वांना उमेदवारी दिली आहे.