Chandrashekhar Bawankule News: गेल्या अनेक दिवसांपासून लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी या मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहे. विधानसभा निवडणुकीत दिलेली आश्वासने सत्तेत आल्यावर महायुती सरकार विसरले. महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये आणि शेतकरी कर्जमाफी कधी करणार, असे प्रश्न सातत्याने विरोधक करत आहेत. यासंदर्भात आता भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.
राज्याला आर्थिक शिस्त लागणे गरजेचे आहे. आत्ता लगेच आश्वासने पूर्ण करणे शक्य नाही. हळूहळू आश्वासनांची पूर्तता केली जाईल, असे महायुती सरकारकडून सांगितले जात आहे. महायुतीमधील अनेक नेते लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, हे सातत्याने सांगत आहेत. यातच आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत विधान केले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
आमचे सरकार योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल
आम्ही विधानसभा निवडणुकीला समोर गेलो तेव्हा संकल्प केला होता आणि त्यामध्ये आम्ही पाच वर्षांत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे सांगितले होते. त्या संकल्पामध्ये ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या होत्या, त्या गोष्टी पाच वर्षांत पूर्ण करू. आमचे सरकार योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल. जेव्हा आम्ही पुढील निवडणुकीला समोर जाऊ तेव्हा, आमच्या संकल्पपत्रामधील एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही. जो वचननामा आम्ही जनतेला मते घेताना दिला तो नक्कीच पूर्ण करू, अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगड दौऱ्यावर येणार आहेत. तेव्हा ते सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भोजनासाठी जाणार आहेत. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, आमच्या अमित शाह यांनी महायुतीतील एका पक्षाच्या अध्यक्षाला वेळ दिला आहे. हे आमचे संस्कार आहे. अमित शाह तटकरेंच्या घरी जात असतील, तर गोगावले, एकनाथ शिंदे आणि आम्ही नाराज होण्याच कारण नाही. सुनील तटकरे यांनी महायुतीच्या सर्वच पक्षाच्या लोकांना निमंत्रण दिले आहे. एकनाथ शिंदेंना निमंत्रण दिले आहे, गोगावलेंना निमंत्रण दिल आहे. आम्हालाही निमंत्रण आहे. या भेटीचा राजकीय अर्थ कोणी काढू नये, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.