“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 15:24 IST2025-04-26T15:23:02+5:302025-04-26T15:24:53+5:30

BJP Jaykumar Gore News: एवढा सक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले पाहिजेत, यात काहीच शंका नाही, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे.

bjp jaykumar gore said devendra fadnavis should be chief minister even after 2034 and bjp power should remain uninterrupted | “२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

BJP Jaykumar Gore News: २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला न भूतो असे यश मिळाले. त्यातही भाजपा पक्ष क्रमांक एकचा पक्ष ठरला. परंतु, यानंतर शपथविधीपासून ते मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत अनेक टप्प्यांवर महायुतीत मानापमान नाट्य घडल्याचे पाहायला मिळाले. पालकमंत्रीपदावरून महायुतीत असलेली धुसपूस अद्यापही शमलेली नाही. यातच महायुतीतील घटक पक्ष एकमेकांवर कुरघोडी करायची एकही संधी सोडत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जाते. यातच आता भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे भाकित केले आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, अनेक नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत.

विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस २०३४ पर्यंत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील. विकसित महाराष्ट्राचा संकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर असल्याशिवाय विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही. आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच आपल्याला पुढे जायचे आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डबल इंजिनचे सरकारच महाराष्ट्राचे भले करू शकते, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. यावरून आता भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी भाष्य केले.

२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत. भाजपा नेते आहेत. भाजपाची सत्ता अविरत राहावी ही माझी मनापासूनची इच्छा आहे. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले पाहिजेत, यात काहीच शंका नाही. एवढा सक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे. त्यामुळे २०३४ काय त्यापुढे असले तरीही हरकत नाही, असे जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणावरून देशातील सर्वांच्याच मनात प्रचंड चीड आहे. नक्कीच याला उत्तर द्यावे लागेल. पंतप्रधान मोदी यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील, अशी टीकाही जयकुमार गोरे यांनी केली.

दरम्यान, शरद पवार यांनी केलेल्या विधानावर जयकुमार गोरे यांनी भाष्य केले. शरद पवार मोठे नेते आहेत. मात्र अशा प्रसंगी प्रश्न निर्माण करणे ही त्यांची जुनी सवय आहे. मात्र देश एकत्र आहे. देशाने एकत्र राहून मुकाबला केला पाहिजे. अशा संकटात या प्रवृत्तीचा नायनाट केला पाहिजे. अशावेळी सर्वांनी एकत्र यायला हवे. कधी पुलवामा हल्ल्यावर शंका निर्माण केली. आता यावर केली जात आहे. मात्र याची चर्चा होऊ नये, एवढीच अपेक्षा आहे, असेही गोरे यांनी म्हटले आहे. 

 

Web Title: bjp jaykumar gore said devendra fadnavis should be chief minister even after 2034 and bjp power should remain uninterrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.