"हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी असतात का पैसे कमावण्यासाठी?"; भाजपा आमदाराचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:48 IST2025-04-04T12:47:56+5:302025-04-04T12:48:32+5:30
BJP Chitra Wagh : भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी पुण्यातील घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

"हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी असतात का पैसे कमावण्यासाठी?"; भाजपा आमदाराचा संताप
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर रुग्णांच्या जीवापेक्षा पैशांना प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. २९ मार्च रोजी झालेल्या या दुर्दैवी घटनेत तनिषा भिसे या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. तनिषा या विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या. या घटनेनंतर भाजपा आमदारांनी संताप व्यक्त केला आहे.
"हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी असतात का पैसे कमावण्यासाठी या प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. असंवेदनशील, अमानवीय वागणूक मिळत असेल तर त्या रुग्णालयांना टाळे ठोका. असंवेदनशील डॉक्टरांचे लायसन्स रद्द करा" असं म्हणत टीका केली आहे. भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी पुण्यातील या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी असतात का पैसे कमावण्यासाठी या प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 3, 2025
दिनानाथ मंगेशकर चॅरिटेबल हॉस्पिटलच्या गलथानपणामुळे पुण्यातील आमदार अमित गोरखे यांच्या स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी दगावली. तनिषा आणि तिचे कुटुंब खरं तर आनंदात होते. तनिषा गरोदर…
"दिनानाथ मंगेशकर चॅरिटेबल हॉस्पिटलच्या गलथानपणामुळे पुण्यातील आमदार अमित गोरखे यांच्या स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी दगावली. तनिषा आणि तिचे कुटुंब खरं तर आनंदात होते. तनिषा गरोदर होती आणि तिला जुळी मुलं होणार होती मात्र अचानक सातव्या महिन्यात तिला प्रसूती कळा सुरू झाल्या… म्हणून तिला दीनानाथ हॉस्पिटलमध्ये नेलx तर आधी १० लाख भरा मगच हॉस्पिटल मध्ये एडमिशन मिळेल असा पवित्रा तिथल्या निर्ढावलेल्या डॉक्टरांनी घेतला. हे पाहून तनिषाचं मनोबल खचलं… ज्या डॉक्टरांनी धीर द्यायला हवा त्या डॉक्टरांनी थेट दुकानदारी दाखवली होती."
"मंत्रालयातून देखील मंगेशकर हॉस्पिटलला कॉल केला तरीही मुर्दाड मनाच्या डॉक्टरांना काही फरक पडला नाही. तनिषा प्रसूतीच्या वेदनेने विव्हळत राहिली पण मेलेल्या मनाच्या डॉक्टरांना दिसत नव्हते. खरं तर आज एका आमदाराच्या निकटवर्तीयाच्या जीवावर बेतलं सर्वसामान्य रुग्णांचे काय हाल करत असतील याचा विचार न केलेला बरा. चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल मधून रुग्णांना असंवेदनशील आणि अमानवीय वागणूक मिळत असेल तर त्या रुग्णालयांना टाळे ठोका आणि अशा असंवेदनशील डॉक्टरांचे लायसन्स रद्द करा. एकाला कायद्याचा दणका बसला तर बाकीचे तरी सुधारतील" असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.