“बिनबुडाचे चंबू! उद्धव ठाकरेंना राजकीयदृष्टया संपवायला संजय राऊत...”; भाजपा नेत्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 21:54 IST2025-04-14T21:54:14+5:302025-04-14T21:54:56+5:30

BJP Chandrashekhar Bawankule News: महायुती सरकारने क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावे, अशी शिफारस केंद्र सरकारला केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना असे काही सुचले नाही, अशी विचारणा भाजपा नेत्यांनी केली.

bjp chandrashekhar bawankule replied sanjay raut and uddhav thackeray over cm devendra fadnavis | “बिनबुडाचे चंबू! उद्धव ठाकरेंना राजकीयदृष्टया संपवायला संजय राऊत...”; भाजपा नेत्याची टीका

“बिनबुडाचे चंबू! उद्धव ठाकरेंना राजकीयदृष्टया संपवायला संजय राऊत...”; भाजपा नेत्याची टीका

BJP Chandrashekhar Bawankule News: गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या धार तीव्र होताना दिसत आहेत. महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, दोन्ही बाजूचे नेते एकमेकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र प्रतिगामी शक्तींच्या विळख्यात सापडला. ‘फुले’ चित्रपटास त्यातूनच विरोध सुरू आहे. महाराष्ट्रात ‘फुले-आंबेडकर विरुद्ध फडणवीस’ असा हा झगडा आहे! मुख्यमंत्री फडणवीस या सामाजिक विषयावर गप्प का बसले आहेत? त्यांनी मौन सोडावे. नाहीतर हा झगडा ‘फुले विरुद्ध फडणवीस’ असाच आहे यावर शिक्का बसेल, अशी टीका संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून केली होती. याला आता भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर पोस्ट करून प्रत्युत्तर दिले ाहे. 

कधी काळी उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री होते, या गोष्टीवर विश्वास बसू नये, असाच त्यांचा सध्याचा वावर आहे. ‘सामना’तील अलीकडच्या काही दिवसांतील अग्रलेख हे उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्टया संपविण्यासाठी संजय राऊतांकडून लिहिले जात आहेत, अशी शंका खुद्द उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या माणसांकडूनच व्यक्त केली जात आहे. अकलेचा कांदा... म्हणजे कोण तर याचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला चांगलंच ठाऊक आहे. हो तेच बिनबुडाचे चंबू! रोज सकाळी उठून आपणच किती ग्रेट, थोर, विचारवंत आहोत असे भासवण्याचा ज्यांना ऊत येतो तेच ! ते कोण आहेत? हे महाराष्ट्राला ठाऊक आहे, अशी खोचक टोला बावनकुळे यांनी लगावला आहे.

अरे महाभागा, तुमची बुद्धी गचाळ होत चालली

आजही त्यांनी भांडण लावण्याचा केविलवाणा प्रयत्न महाराष्ट्रात केला. त्यांची कीव आली. सत्ता गेली की व्यक्ती किती अगतिक होतो, बरळू लागतो, आजूबाजूचे पिवळे दिसू लागते. महात्मा जोतिबा फुले यांच्यावरील चित्रपटावरून त्यांना मानसिक ऊत आला, त्यांनी गरळ ओकली. लोकनेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले. अर्थात, ज्यांनी आरोप केले त्यांना खरंतर बुडच नाही. काय तर म्हणे, फुले विरुद्ध फडणवीस!! अरे महाभागा, तुमची बुद्धी गचाळ होत चालली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असलेल्या महायुती सरकारने क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ द्यावे अशी शिफारस विधिमंडळात ठराव करून केंद्र सरकारला केली आहे, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना असे काही सुचले नाही आणि आता त्यांचे बगलबच्चे फुले विरुद्ध फडणवीस असा नवा शोध लावून बोंबलत सुटले. महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत खोटारड्यांवर आसूड ओढला. तरी अक्कल ठिकाणावर आली नाही. उद्धव ठाकरे यांना कळतच नाही की, नव्या महाभारतात झोपेचे सोंग घेतलेला संजय बिनकामाचा आहे. सर्व संपल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल. पण तेव्हा ते काहीच करू शकणार नाहीत, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

 

Web Title: bjp chandrashekhar bawankule replied sanjay raut and uddhav thackeray over cm devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.