शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 13:56 IST2025-10-06T13:55:51+5:302025-10-06T13:56:54+5:30
ठाणे, पुणे अथवा सिंधुदुर्ग असेल याठिकाणी महायुतीचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.

शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
मुंबई - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधीच सत्ताधारी भाजपा आणि शिंदेसेनेत वादाचे खटके उडू लागल्याचं चित्र दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात भाजपा नेते मंत्री गणेश नाईक सातत्याने आक्रमक विधाने करत आहेत. त्यावरून ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेतील कटुता वाढली आहे. हे वाद संपत नाही तोवर पुणे, सिंधुदुर्ग येथेही शिंदेसेनेचे नेते उघडपणे भाजपा मंत्र्यांविरोधात वक्तव्ये करत आहेत.
पुण्यात गुंड निलेश घायावळ प्रकरणी शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रवींद्र धंगेकर म्हणाले की, निलेश घायावळ आज गुंडगिरी करत नाही. गेली अनेक वर्ष तो कोथरूड भागात दहशत निर्माण करण्याचं काम करतोय. त्याला पासपोर्ट मिळत असेल, त्याला शासकीय सुविधा घरपोच मिळत असेल तर त्याच्यामागे कुणाचा हात आहे ही वस्तूस्थिती लपून राहिली नाही. निलेश घायावळ याला ज्या पोलिसाने पासपोर्ट दिला त्याची चौकशी झाली पाहिजे. त्यात कुणी हस्तक्षेप केला, कुणी दबाव आणला हे शोधले पाहिजे. चंद्रकांत पाटील कोल्हापूरहून पुण्यात आल्यापासून त्यांच्या डोळ्यासमोर हे आहे. त्यांच्या ऑफिसमधून गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळत असेल ही गुन्हेगारी संपणार नाही. यात पूर्णपणे पाप चंद्रकांत पाटील यांचे आहे असं त्यांनी आरोप केला.
दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील कर्ज घोटाळ्याप्रकरणी नुकतेच एकनाथ शिंदेंच्या सेनेत प्रवेश केलेले राजन तेली यांनी गंभीर आरोप केले. जिल्हा बँकेतील कर्ज घोटाळ्यामागचे सूत्रधार पालकमंत्री नितेश राणे आहेत. कोकणात सहकार क्षेत्र टिकवण्यासाठी शासनाने लक्ष घातले पाहिजे. जे भूमाफिया आहेत ते पालकमंत्री नितेश राणेंचे बॅनर लावतात. मी गेली ७-८ महिने बँकेचे गैरव्यवहार आणि कर्ज घोटाळ्यावर बोलतोय. रॉक्सस्टार ही कंपनी हिला कर्ज देण्यात आले. हे बाहुले नितेश राणे यांचे आहे. पालकमंत्री नितेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली बँक चाललीय, या सर्व घोटाळ्यामागे ते आहेत. २० हजार मानधनावर असलेल्या पीएला साडे सात कोटी कर्ज दिले गेले असा आरोप राजन तेली यांनी नितेश राणेंवर केला आहे.
दरम्यान, ठाणे, पुणे अथवा सिंधुदुर्ग असेल याठिकाणी महायुतीचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. भ्रष्टाचार, गुन्हेगारीला खतपाणी घालण्यासारखे गंभीर आरोपच शिंदेसेनेचे नेते भाजपा मंत्र्यांवर करत असले तर सर्वसामान्यांनी कुणाकडे दाद मागायची हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे. राज्यातील सत्ता एकत्रित उपभोगायची आणि स्थानिक पातळीवर एकमेकांचे वाभाडे काढायचे असं धोरण शिंदेसेना-भाजपा नेत्यांनी अवलंबलंय का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.