बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 07:07 IST2025-11-15T07:07:05+5:302025-11-15T07:07:35+5:30
Bihar Assembly Election Result: बिहारमध्ये भाजप-जदयूला मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महायुतीचे आणि त्यातही भाजपचे मनोबल वाढणार असून, काँग्रेसच्या आव्हानांमध्ये भर पडली आहे.

बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
मुंबई - बिहारमध्ये भाजप-जदयूला मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महायुतीचे आणि त्यातही भाजपचे मनोबल वाढणार असून, काँग्रेसच्या आव्हानांमध्ये भर पडली आहे.
बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध काँग्रेस नेते राहुल गांधी, तर नितीशकुमारविरुद्ध तेजस्वी यादव असा सामना होता. मोदी-नितीशकुमार यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्याचे निकालात दिसले. नितीशकुमार यांच्या जदयुचे महाराष्ट्रात अस्तित्व नाही. मात्र, आपल्या सर्वोच्च नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागली असताना विजय मिळाल्याने भाजपचे कार्यकर्ते, नेते यांना बळ मिळाले आहे.
‘लाडकी बहीण’चा फायदा
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या आधी महिन्याकाठी दीड हजार रुपये देणारी लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने आणली आणि त्याचा प्रचंड फायदा महायुतीला निकालात झाला होता. बिहारमध्ये त्याच धर्तीवर, पण एकदा दहा हजार रुपये लाखो महिलांना देण्यात आले, त्याचा मोठा फायदा जदयू-भाजप युतीला झाला.
‘ते’ भाकीत ठरले खोटे
बिहारमधील निकालानंतर केंद्रातील सरकार कोसळेल व महाराष्ट्रातही त्याचे परिणाम दिसतील असे भाकीत उद्धवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केले होते. मात्र, ते भाकीत सपशेल खोटे ठरले आहे. विधानसभेला महाराष्ट्रात मविआला दारुण पराभव पत्करावा लागला होता. त्यातून अद्यापही सावरलेली नसताना मविआला आता हा ‘जोर का झटका’ मिळाला आहे.
महाराष्ट्रात काय होणार?
बिहारमधील मतदारयाद्यांवरून राजद व काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगासह केंद्र व बिहार सरकारवर आरोपांची राळ उठविली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणा आणि महाराष्ट्र, बिहारमधील मतचोरीचे अनेक आरोप केले. मात्र, या आरोपांचाही मतदारांवर परिणाम झाला नाही हे बिहारच्या निकालाने दिसले.
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस, उद्धवसेना, शरद पवार गटाने मतचोरी आणि दुबार मतदारांवरून रान उठविले, त्याचा परिणाम आगामी निवडणुकीत होणार का, हे बघणे औत्सुक्याचे असेल.
बिहारच्या निकालामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत बिहारी व हिंदी मते भाजपच्या बाजूने एकटतील असेही म्हटले जात आहे.