देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का, नागपूरची जागा हातची गेली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 09:24 AM2023-02-03T09:24:42+5:302023-02-03T09:25:13+5:30

Vidhan Parishad Election Result: विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघातील समर्थन दिलेल्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे.

Big shock to Devendra Fadnavis, Nagpur seat lost | देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का, नागपूरची जागा हातची गेली

देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का, नागपूरची जागा हातची गेली

Next

मुंबई :  विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघातील समर्थन दिलेल्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली होतीच शिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री सुधीर मुनगंटीवार असे दिग्गज नेते असूनही नागपूरची जागा हातची गेली. पाच जागांपैकी भाजप- १, राष्ट्रवादी १, अपक्ष १, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ (मविआ समर्थित) १ असे पक्षीय बलाबल आहे. 

जुन्या पेन्शनच्या मागणीचे उट्टे
नागपूर पदवीधर मतदारसंघात संदीप जोशी यांच्या पराभवाने फडणवीस यांना असाच मोठा धक्का दिला होता. त्यावेळी ते विरोधी पक्षनेते होते. मविआ सरकार राज्यात होते. आता भाजपचे सरकार असतानाही पराभव पाहावा लागला आहे. दोनवेळा आमदार राहिलेले शिक्षक परिषदेचे नागो गाणार यांच्याविषयीची नाराजी, मविआच्या नेत्यांची मेहनत, भाजपमधील समन्वयाचा मोठा अभाव यामुळे पराभवाची नामुष्की ओढावल्याचे म्हटले जात आहे.

काळे यांची मेहनत आली मदतीला धावून 
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचा गड राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांनी राखला. भाजपने पूर्ण ताकद लावूनही त्यांनी वर्चस्व सिद्ध केले. शिक्षक आमदार म्हणून आतापर्यंत घेतलेली मोठी मेहनत त्यांच्या मदतीला धावून आली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी साथ दिली आणि राष्ट्रवादीच्या गडाला धक्का देण्याचे भाजपचे मनसुबे उधळले गेले. मराठवाड्यात भाजपचे दिग्गज नेते असतानाही पराभव पदरी आला. 

तांबेंना सर्वपक्षीय संबंध कामास आले 
नाशिकमध्ये सत्यजित तांबे यांनी सहज विजय मिळविला. डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेसचा एबी फॉर्म मिळूनही निवडणूक न लढणे, सत्यजित यांना अपक्ष लढविणे आणि भाजप-शिंदे गटाने तांबे यांना दिलेला छुपा पाठिंबा तसेच डॉ. तांबे यांची या मतदारसंघावर असलेली पकड व सर्वपक्षीय संबंध कामास आले. तांबे आता विधान परिषदेत अपक्ष राहतात की भाजपचे सहयोगी सदस्य होतात, याबाबत उत्सुकता असेल. 

जुनी पेन्शन योजना, भाजपमधील धुसफूस भोवली
nअमरावती पदवीधर मतदारसंघात रात्री उशिरापर्यंत निकाल लागला नव्हता. पण काँग्रेसचे धीरज लिंगाडे यांनी आश्चर्यकारकरित्या आघाडी घेतली. माजी राज्यमंत्री आणि फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जाणारे डॉ. रणजित पाटील माघारले. 
nपहिल्या फेरीपासून लिंगाडे यांनी आघाडी घेतली. पाटील आरामात जिंकतील, असे भाजपचे नेते छातीठोकपणे सांगत होते. मात्र, त्यांची मोठी दमछाक होताना आणि पराभव त्यांचा पाठलाग करताना दिसत आहे. 
n    परंपरागत मतदारांना गृहित धरणे, जुनी 
पेन्शन योजना, भाजपमधील धुसफूस, लिंगाडे यांनी केलेला नियोजनबद्ध प्रचार यामुळे चित्र बदलल्याचे म्हटले जाते.

Web Title: Big shock to Devendra Fadnavis, Nagpur seat lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.