ST Bus Fare Hike: मोठी बातमी: आजपासून एसटी बसचा प्रवास महागला; १५ टक्के भाडेवाढीचा निर्णय, रिक्षा-टॅक्सीबाबतही निर्णय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 11:10 IST2025-01-24T11:03:20+5:302025-01-24T11:10:21+5:30
ST Bus Ticket Fare Hike: एसटी बसेससोबतच रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीलाही मान्यता देण्यात आली असून या दोन्ही वाहनांच्या दरात ३ रुपयांची वाढ होणार आहे.

ST Bus Fare Hike: मोठी बातमी: आजपासून एसटी बसचा प्रवास महागला; १५ टक्के भाडेवाढीचा निर्णय, रिक्षा-टॅक्सीबाबतही निर्णय!
ST Bus Ticket Fare Hike: सर्वसामान्य प्रवाशांसाठी हक्काचे साधन अशी ओळख असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी बसेसच्या तिकीट दरात १४.९७ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे. ही दरवाढ आजपासूनच लागू होणार असल्याचीही माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता लालपरीचा प्रवास महागणार आहे. एसटी बसेससोबतच रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीलाही मान्यता देण्यात आली असून या दोन्ही वाहनांच्या दरात ३ रुपयांची वाढ होणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.
"राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक काल मंत्रालयात पार पडली. त्या बैठकीत एसटीसह रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला. एसटीची भाडेवाढ गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढत असल्याने भाडेवाढ दरवर्षी होणे अपेक्षित असते. मात्र मागील ३ ते ४ वर्षांपासून एसटीची भाडेवाढ झाली नव्हती. त्यामुळे आता एकत्रित १४.९७ टक्के इतकी भाडेवाढ करण्यात आली असून ती आजपासून लागू होईल. तसंच रिक्षा आणि टॅक्सीच्या दरातही ३ रुपयांची वाढ करण्यात आली असून तो निर्णय १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे," अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
दरम्यान, भाडेवाढीमुळे रिक्षाचे किमान भाडे २३ रुपयांहून २६ रुपये इतके होणार असून टॅक्सीचे किमान भाडे २८ रुपयांहून ३१ रुपये इतके होणार आहे.