मोठी बातमी : शरद पवार थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार, अजितदादांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 13:16 IST2023-12-02T13:12:03+5:302023-12-02T13:16:57+5:30
अजित पवार गटाने गंभीर आरोप करत संशयाचं धुकं निर्माण केल्यानंतर आज शरद पवार सडेतोड प्रत्युत्तर देणार आहेत.

मोठी बातमी : शरद पवार थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार, अजितदादांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देणार!
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचे दोन दिवसीय राज्यव्यापी शिबीर कर्जत येथील 'रॅडिसन ब्ल्यू हॉटेल'मध्ये पार पडले. या शिबिराच्या समारोपाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या भाषणाची राज्यभर मोठी चर्चा झाली. कारण आपल्या भाषणात अजित पवारांनी गौप्यस्फोट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अनेक गंभीर केले. राष्ट्रवादीने याआधी भाजपसोबत जाण्यासाठी कसे प्रयत्न केले होते, याबाबतचे दावे करत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. या पार्श्वभूमीवर आज पुण्यात शरद पवार पत्रकार परिषद घेणार असून या माध्यमातून ते अजित पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.
पुण्यातील गुलटेकडी परिसरातील निसर्ग कार्यालय येथे आज दुपारी ४ वाजता शरद पवार यांची पत्रकार परिषद होणार असून याबाबतची माहिती राष्ट्रवादीच्या अधिकृत 'एक्स' हँडलवरून शेअर करण्यात आली आहे. ही पत्रकार परिषद नेमकी कोणत्या विषयावर असणार आहे, याबाबतचा उल्लेख सदर पोस्टमध्ये करण्यात आलेला नाही. मात्र अजित पवार यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर कालपासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं असल्याने शरद पवार हे त्यावरच आपली बाजू मांडतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार हे आपल्या पत्रकार परिषदेतून अजित पवार आणि त्यांच्या गटातील नेत्यांचा कसा समाचार घेतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
पत्रकार परिषदेचे निमंत्रण
— NCP (@NCPspeaks) December 2, 2023
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांची पत्रकार परिषद
आज शनिवार दिनांक ०२ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४.०० वा. वाजता
स्थळ -
निसर्ग कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ, मार्केटयार्ड, गुलटेकडी,…
अजित पवार गटाकडून शरद पवारांवर कोणते गंभीर आरोप?
१. राष्ट्रवादीकडून २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतरच भाजपसोबत युती करण्यासाठी चर्चा सुरू होती.
२. मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, तुम्ही सत्तेत जा, असं शरद पवारांनी आम्हाला सांगितल्याचा अजित पवारांचा दावा.
३. अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर स्वत: शरद पवारांनीच यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांना आंदोलन करायला सांगितलं- अजित पवार
४. सत्तेत सहभागी झाल्यानंतर आमदार आणि मंत्र्यांना स्वत: शरद पवारांनीच वाय.बी. सेंटर येथे भेटायला बोलावलं.
५. सत्तेत सहभागी झाल्यावर चर्चा करून आम्हाला गाफील ठेवल्याचा अजित पवारांचा आरोप.