मराठा समाजातील मोठ्या नेत्यांनाच आरक्षण नको; चंद्रकांत पाटील यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 07:50 AM2020-09-22T07:50:04+5:302020-09-22T07:51:17+5:30

मराठा समाज गरीब राहिला, तो बेरोजगार राहिला तर यांच्यामागे तो फिरत राहील आणि हेच या मोठ्या नेत्यांना हवे आहे. गरीब समाजाचे हित व्हावे यासाठी त्यांनी काहीच केले नाही.

big leaders of Maratha community don't want reservation; Allegation of Chandrakant Patil | मराठा समाजातील मोठ्या नेत्यांनाच आरक्षण नको; चंद्रकांत पाटील यांचा आरोप

मराठा समाजातील मोठ्या नेत्यांनाच आरक्षण नको; चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Next

कोल्हापूर : राज्य सरकारमधील बड्या मराठा नेत्यांनाच आपल्या नावापुढे ‘बॅकवर्ड’ असे लिहिले जाऊ नये असे वाटते; परंतु गरीब मराठ्यांचे यामुळे जगणे मुश्कील होत आहे, याची जाणीव त्यांना नाही. आपला समाज केवळ आपल्यामागे फरपटत यावा, अशीच यातील अनेकांची इच्छा आहे. गेल्या १५ वर्षांत महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी मराठा आरक्षण दिले नाही, यातूनच त्यांची मानसिकता दिसून येते, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.


मराठा समाज गरीब राहिला, तो बेरोजगार राहिला तर यांच्यामागे तो फिरत राहील आणि हेच या मोठ्या नेत्यांना हवे आहे. गरीब समाजाचे हित व्हावे यासाठी त्यांनी काहीच केले नाही. मराठा समाजाचे प्रश्न सोडवावे, असे राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडीला वाटत असेल, तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये १५०० कोटी रुपयांची मंजुरी द्यावी. मात्र असे काही न करता मराठा समाजाचे आंदोलन दडपून काढण्याच्या दृष्टीने १४४ कलम लागू करून आरक्षणाची चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका त्यांनी केली.

‘त्या’ नेत्याचे नाव सांगा; अशोक चव्हाण यांचे प्रत्युत्तर
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, असे वाटणाऱ्या नेत्याचे नाव सांगा. उगीच हवेत गोळीबार करून गैरसमज पसरवू नका, अशा शब्दांत मंत्री अशोक चव्हाण यांनी चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिले.
सध्या सर्व नेत्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात एकजूट होण्याची गरज आहे. सर्वांनी एकसुरात आरक्षणाचे समर्थन करायला हवे. मात्र चंद्रकांत पाटील सातत्याने गैरसमज पसरविणारी वक्तव्ये करून समाजात संभ्रम निर्माण करू पाहत आहेत. या आरक्षणाला कोणत्या नेत्याचा विरोध आहे, हे त्यांनी जगजाहीर करावे, असे आव्हान चव्हाण यांनी दिले.
मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवावी, असा विनंती अर्ज राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला आहे, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.

मराठा समाजाच्या नेत्यांनी संयम बाळगावा
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

पुणे : मराठा समाजाच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाचा विषय गुंतागुंतीचा करू नये. मराठा नेत्यांनी थोडा संयम बाळगावा. अधिक गोंधळ झाल्यास राज्यातील आरक्षणही गमवायची वेळ येऊ शकते, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ओबीसी समाजाने मोठे मन करून मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करून घ्यावे, असे आवाहन राष्टÑवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे. यावर ते म्हणाले, मी जे काही सोशल मीडियावर वाचतोय त्यावरून हेच दिसते की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे; मात्र आमच्या ताटातले नको, अशी ओबीसी समाजाची भूमिका आहे. ओबीसीमध्ये हिस्सा मागण्याच्या भानगडीत मराठा नेत्यांनी पडू नये. महाराष्ट्रात जरी मराठा समाज १६ टक्के असला तरी देशात तो फक्त २ टक्के आहे. त्यामुळे देशभरातील ओबीसी एकत्र आले तर महाराष्ट्रापुरते मिळणारे आरक्षणही मिळणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या स्टे आॅर्डरने घाबरून जाऊ नये.

Web Title: big leaders of Maratha community don't want reservation; Allegation of Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.