Maharashtra Government : ठाकरे मंत्रिमंडळाच्या संपूर्ण खात्यांचं सहा मंत्र्यांमध्ये वाटप, जाणून घ्या कोणाला काय मिळालं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 05:20 PM2019-12-12T17:20:02+5:302019-12-12T17:50:03+5:30

Maharshtra News : महाविकास आघाडीचं संपूर्ण खातेवाटप जाहीर करण्यात आलं.

Big Breaking: Maharashtra portfolio allocation divided into 6 ministers by uddhav thackeray | Maharashtra Government : ठाकरे मंत्रिमंडळाच्या संपूर्ण खात्यांचं सहा मंत्र्यांमध्ये वाटप, जाणून घ्या कोणाला काय मिळालं?

Maharashtra Government : ठाकरे मंत्रिमंडळाच्या संपूर्ण खात्यांचं सहा मंत्र्यांमध्ये वाटप, जाणून घ्या कोणाला काय मिळालं?

Next

मुंबईः महाविकास आघाडीचं संपूर्ण खातेवाटप जाहीर करण्यात आलं असून, ठाकरे मंत्रिमंडळाच्या सर्वच खात्यांचं सहा मंत्र्यांमध्ये वाटप करण्यात आलेलं आहे. आजमितीस सर्व मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खाते कायम स्वतःकडे ठेवले आहे. परंतु पहिल्यांचा उद्धव ठाकरेंनी ते एकनाथ शिंदेंकडे सोपवून नवा पायंडा पाडला आहे. विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस हे चारही मुख्यमंत्री त्याला अपवाद नव्हते. शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदेच सगळ्यात मोठे नेते असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांना हे खाते मिळाल्यामुळे शिवसेनेत शिंदे यांचे वजन वाढणार आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह, नगरविकास, वने, पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य आणि माजी सैनिक कल्याण या खात्यांचा कार्यभार सोपवण्यात आलेला आहे. 

तर छगन भुजबळांकडे ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास आणि उद्योजकता, अन्न आणि औषध प्रशासन ही खाती देण्यात आलेली आहेत. तसेच काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय ही खाती सोपवण्यात आली आहेत.

सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग व खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषी, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य, राजशिष्टाचार, भूकंप आणि पुनर्वसन, बंदरे आणि खार भूमी विकास या खात्यांच्या कार्यभार देण्यात आलेला आहे. तर जयंत पाटील यांच्याकडे वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास ही खाती बहाल करण्यात आलेली आहेत.नितीन राऊत यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बालविकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण ही खाती देण्यात आलेली आहेत. 

दरम्यान, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन पंधरा दिवस झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप रखडले होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शपथविधी झालेले सहा मंत्री आजवर बिनखात्याचे आहेत. गृह, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खात्यावरून खाते वाटप रखडले होते. गृह खात्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीने दावा सांगितला होता. सा. बांधकाम खात्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू होती. मात्र, बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेअंती खाते वाटपावर सहमती झाली.
 

Web Title: Big Breaking: Maharashtra portfolio allocation divided into 6 ministers by uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.