काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 13:04 IST2025-08-16T13:03:50+5:302025-08-16T13:04:43+5:30
Padmakar Valvi Joins Congress: विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर राज्यातील पक्षसंघटना उभी करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेसने भाजपाला मोठा धक्का दिला आहे. नंदूरबार जिल्ह्यातील भाजपचे नेते व माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
मुंबई - विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर राज्यातील पक्षसंघटना उभी करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेसनेभाजपाला मोठा धक्का दिला आहे. नंदूरबार जिल्ह्यातील भाजपचे नेते व माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. पद्माकर वळवी यांनी गतवर्षी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला होता. मात्र वर्षभरातच त्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे.
पद्माकर वळवी यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बुलढाणा येथील निवासस्थानी भेट घेऊन काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, आदिवासी काँग्रेसचे प्रदेश महासचिव ॲड. रोशन गावित, धुळे आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक अहिरे तसेच बुलढाणा शहर काँग्रेस अध्यक्ष दत्ता काकस, इरफान पठाण व काँग्रेस पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा संपन्न झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पद्माकर वळवी यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.
“माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. लवकरच नंदूरबार येथे भव्य कार्यक्रमात त्यांच्या सहका-यांनाही काँग्रेस पक्षात औपचारिक प्रवेश देण्यात येईल. पद्माकर वळवी यांच्या काँग्रेस प्रवेशाने नंदूरबार जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला आणखी ताकद मिळेल. काँग्रेसचा विचार हाच सर्वांना सोबत घेऊन जाणारा तसेच लोकशाही व संविधान अबाधित राखणारा पक्ष आहे. इतर पक्षातूनही आणखी अनेक नेते काँग्रेस पक्षात प्रवेश घेऊ इच्छूक आहेत”. असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले.
हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून पक्षात इनकमिंग सुरु झाले आहे. मागील आठवड्यात परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी हजारो समर्थकांसह काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेसह इतर पक्षातील नेत्यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.