अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 19:24 IST2025-11-18T19:24:18+5:302025-11-18T19:24:51+5:30
उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांमध्ये सूचकाची सही नव्हती. हा तांत्रिक मुद्दा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी तपासला आणि आक्षेप योग्य ठरवत उज्वला थिटे यांचा अर्ज तत्काळ रद्द केला.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
सोलापूर : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या उमेदवार उज्वला थिटे यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणामुळे अवैध ठरवण्यात आला आहे. अर्जावर 'सूचकाची' सही नसणे, हे कारण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरले आहे.
उज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी आक्षेप घेतला होता. उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांमध्ये सूचकाची सही नव्हती. हा तांत्रिक मुद्दा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी तपासला आणि आक्षेप योग्य ठरवत उज्वला थिटे यांचा अर्ज तत्काळ रद्द केला.
निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक म्हणाले की, "उज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नव्हती. नियमानुसार हा अर्ज अवैध ठरतो, त्यामुळे तो अर्ज बाद करण्यात आला आहे."
या निर्णयामुळे नगरपंचायत निवडणुकीच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. थिटे यांचा अर्ज बाद झाल्याने आता नगराध्यक्षपदाची लढत आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे.