पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 16:48 IST2025-07-02T16:47:52+5:302025-07-02T16:48:58+5:30
Maharashtra BJP News: गेल्या काही दिवसांपासून एकामागून एक भाजपामध्ये दिग्गज नेत्यांचे प्रवेश होताना पाहायला मिळत आहेत.

पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
Maharashtra BJP News: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येत आहे. इतके दिवस ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत होते. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटालाही काही ठिकाणी खिंडार पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपामधील इन्कमिंग वाढताना दिसत आहे. रविंद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती घेताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
मंगळवारी काँग्रेसचे नेते कुणाल पाटील यांचा भाजपामध्ये प्रवेश झाल्यानंतर लगेचच बुधवारी नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार आणि प्रदेश उपाध्यक्ष अपूर्व हिरे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तर, शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे इंदापूरचे मोठे नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. दुसरीकडे, राजू शेट्टी यांच्यासोबत दीर्घकाळ काम केलेले सावकार मादनाईक यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे. हे तीनही पक्ष प्रवेश एकाच वेळी झाले. यावेळी रविंद्र चव्हाण यांच्यासह चंद्रकांत पाटील आणि भाजपाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
माझ्या वैयक्तिक आयुष्यातील सुवर्ण अक्षराने लिहावा असा क्षण
मला भारत व विश्वातील सर्वांत मोठ्या पक्षात सामील करून घेतले. त्याबाबत रविंद्र चव्हाण यांचे आभार मानतो. पंतप्रधान मोदींच्या विचाराने प्रेरित होऊन प्रवेश करत आहे. राज्यात चौफेर विकासाची कामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहेत. येत्या काळात इंदापूरच्या विकासकामांना मदत करावी ही विनंती आहे. रविंद्र चव्हाण यांच्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष झाल्याचे पाहायला मिळाले, हे फक्त भाजपामध्ये होऊ शकते. माझ्या वैयक्तिक आयुष्यातील सुवर्ण अक्षराने लिहावा असा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया माने यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यावर दिल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, सावकार मादनाईक चळवळीतील कार्यकर्ते आहेत. विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या भूमिका न पटल्यामुळे ते नाराज झाले होते. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र भूमिका घेतली होती. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला फटका बसला होता, असे म्हटले जाते. या सावकार मादनाईक यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.