जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 12:23 IST2025-04-28T12:23:12+5:302025-04-28T12:23:54+5:30
Dr. Shirish Valsangkar Case: एवढ्या मोठ्या डॉक्टरने अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवल्याने या घटनेबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच या प्रकरणाच्या तपासामधून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे.

जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
सोलापूरमधील प्रसिद्ध डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी स्वत:वर गोळ्या झाडून जीवन संपवल्याने खळबळ उडाली होती. एवढ्या मोठ्या डॉक्टरने अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवल्याने या घटनेबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच या प्रकरणाच्या तपासामधून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान, डॉक्टर वळसंगकर यांनी ज्या दिवशी जीवन संपवलं त्या दिवशी दिवसभरात डॉक्टरांच्या मोबाईलवर सुमारे २७ फोन आले होते. तर डॉक्टरांनी जीवन संपवण्यापूर्वी रात्री आठ वाजल्यानंतर चार जणांना फोन केला होता, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. आता डॉक्टरांनी अखेरच्या क्षणी ज्या चार जणांना फोन केले होते ते चारजण कोण, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
दरम्यान, डॉक्टरांनी जिथे जीवन संपवले त्या घटनास्थळावरून पोलिसांनी डॉक्टरांचे रक्ताचे डाग असलेले कपडे, टॉवेल, नॅपकीन, जिवंत काडतूस, ओढलेल्या १९ सिगारेट्स, बुलेटमधील शिसे, बुलेटच्या वरील आवरण, पिस्टल फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले असून, त्या रिपोर्टवरही अवलंबून आहे. याकडेही लक्ष असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
त्याशिवाय डॉक्टरांच्या बेडरूममधून ७० हजार रुपयांचा काळ्या रंगाचा मोबाइल, ग्रे कलरचा ६० हजारांचा दुसरा मोबाइल, एक पेन ड्राइव्ह, डॉक्टरांच्या नावे असलेला शस्त्र परवाना याशिवाय मनीषाने डॉ. आश्विन, डॉ. शिरीष वळसंगकर, साक्षीदार डॉ. उमा वळसंगकर यांना पाठवलेल्या ई-मेलची छायांकित प्रत जप्त केली. या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या मनीषा मुसळे माने हिला गुरुवारी वळसंगकर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तेव्हा मनीषाच्या स्वाक्षरीचे कागदपत्र, ई-मेलचे प्रिंट आऊट जप्त करण्यात आले. शिवाय डॉक्टरांच्या स्वाक्षरीचे कागदपत्रही मिळाले. मात्र, मनीषाने जो माफीनामा दिला होता ती चिठ्ठी अन् संशयास्पद अन्य काही शोधण्यासाठी पोलिसांनी तिचे घर अन् हॉस्पिटल गाठले होते; पण काही हाती लागले नाही, अशी माहितीही समोर येत आहे.