"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 14:30 IST2025-07-21T14:30:23+5:302025-07-21T14:30:40+5:30
अखिल भारतीय छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगेंनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
Chhaava President Vijaykumar Ghadge: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत पत्ते फेकल्यामुळे अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना राष्ट्रावादीचे युवा प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण झाली. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याची सूचना केलीय. दुसरीकडे मारहाण झालेल्या विजयकुमार घाडगे यांनी आम्हाला आणखी मारा पण कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर कारवाई करा अशी मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानपरिषदेत मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र सुनील तटकरे यांना निवदेन दिल्यानंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली. या मारहाणीनंतर सूरज चव्हाण यांना राजीनामा द्यायला सांगितला आहे. मात्र सूरज चव्हाणच्या राजीनाम्याने आम्ही समाधानी नाही आहोत, कारण आमची मुख्य मागणी कृषीमंत्र्यांना बडतर्फ करण्याची होती, असं विजयकुमार घाडगे यांनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटलं. त्यामुळे आता कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनाला सुरुवात झाल्याचेही घाडगे म्हणाले.
"सुरज चव्हाणच्या राजीनाम्याचा काय संबंध? त्यांच्या राजीनाम्याची आमची मागणीच नव्हती. त्यांनी राजीनामा दिला आणि आम्ही समाधानी होऊ असं कोणतं पद आहे त्यांच्याकडे. राज्याच्या कृषिमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी होती. त्या कृषिमंत्र्यांना तुम्ही बडतर्फ करा. अशा लोकांना राजीनामा द्यायला सांगून आमचा तोंडाला पानं पुसता आहात का? कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी पदावरून काढून टाकले पाहिजे ही आमची मागणी आहे. शेतकऱ्यांची जी अवहेलना सुरू आहे ती थांबली पाहिजे," असं विजयकुमार घाडगे म्हणाले.
"हे प्रकरण अंगाशी आल्याने त्यांची नाटकी सुरू आहेत. सूरज चव्हाण म्हणाले की मी असैविधानिक शब्द वापरला. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. आमच्यामध्ये संस्कार आहेत. एक जरी शब्द मी वाकडा बोललो असेल तर मी समाजकारणातून बाजूला होईल. मी चुकीचा शब्द वापरला नाही," असं स्पष्टीकरण विजयकुमार यांनी दिलं.
"काल मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना जी मारहाण झाली ते कुणालाही पटणार नाही. त्यांच्यातील कार्यकर्ते सुद्धा सोडवायला होते, त्यांना सुद्धा हे पटलेलं नाही. आम्ही अजून तुमचा मार खाऊ पण कृषिमंत्र्याचा राजीनामा घ्या. शेतकऱ्यांसाठी आम्ही मार खायला आणि मरायला तयार आहोत. आम्हाला संपवायचा असेल तर संपवून टाका पण हा निष्क्रिय कृषिमंत्री राहिला नाही पाहिजे," असेही विजयकुमार घाडगे म्हणाले.