आता भाजपच्या आमदार, खासदार, मंत्र्यांची दाढी, कटींग करण्यास नाभिक संघटनेचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 17:56 IST2019-11-21T17:47:15+5:302019-11-21T17:56:31+5:30
तसेच भाजपच्या आमदार, खासदार, मंत्र्यांच्या दाढी कटींग यापुढे करायची नाही, अशी भूमिका घेत फडणवीस यांनी माफी मागावी अशी मागणी नाभिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संजय नक्षणे यांनी केली आहे.

आता भाजपच्या आमदार, खासदार, मंत्र्यांची दाढी, कटींग करण्यास नाभिक संघटनेचा नकार
मुंबई - विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. तसेच प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरूनही भाजपवर विरोधात बसण्याची वेळ आली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहंकार नडल्याची चर्चा असताना आता नाभिक समाजाकडूनही भाजपचा निषेध नोंदविण्यात येत आहे. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदी असताना केलेल्या एका वक्तव्यावरून नाभिक बांधव आक्रमक झाले आहेत.
भाजपच्या आमदार, खासदार, मंत्र्यांची दाढी किंवा कटींग करायची नाही, अशी भूमिका यवतमाळमधील नाभिक संघटनेने घेतली आहे. काही महिन्यांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौड तालुक्यातील एका कार्यक्रमात काँग्रेसवर टीका करताना नाभिक समाजाच्या भावना दुखावतील असं वक्तव्य केलं होतं. यावरून नाभिक संघटना आक्रमक झाली आहे.
न्हावी ज्या प्रकारे प्रत्येकाची अर्धी अर्धी कटींग करतो, त्याप्रमाणे काँग्रेसने प्रत्येक ठेकेदाराला अर्धी अर्धी कामं देऊन अर्धवट कामं केल्याची टीका फडणवीस यांनी केली होती. या वक्तव्यावरून नाभिक समाजाने निषेध नोंदवला आहे. तसेच भाजपच्या आमदार, खासदार, मंत्र्यांच्या दाढी कटींग यापुढे करायची नाही, अशी भूमिका घेत फडणवीस यांनी माफी मागावी अशी मागणी नाभिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संजय नक्षणे यांनी केली आहे.