“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 14:43 IST2025-07-06T14:41:22+5:302025-07-06T14:43:46+5:30

Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगा, राजकारण बाजूला ठेऊन सरकारला कर्जमाफीचा निर्णय देण्याची सद्बुद्धी दे अशी तुझ्याकडे प्रार्थना, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

bachchu kadu post on ashadhi ekadashi 2025 give the government the wisdom to waive off loans | “विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट

“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात लाखो भाविका, वारकरी आले आहेत. वारकरी मनोभावे विठ्ठलाचे दर्शन घेत आहेत. राज्यातही भक्तिपूर्ण वातावरणात आषाढी एकादशी साजरी केली जात आहे. दुसरीकडे आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. यातच आषाढी एकादशीनिमित्त शेतकरी नेते बच्चू कडू यांनी एक्सवर एक पोस्ट करत विठुरायाला साकडे घातले आहे. 

बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला आहे. यावरून महायुती सरकारवर टीका करण्यात येत आहे. सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, पण अजूनही अनेक मागण्यांवर तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे बच्चू कडू हे आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. यातच आषाढी एकादशीनिमित्त बच्चू कडू यांनी विठुरायाला साकडे घालत सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे, असे म्हटले आहे. 

विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...

विठ्ठला, मागील ३ महिन्यात महाराष्ट्रात ७६७शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलंय. दिवसरात्र शेतात राबून बळीराजा साऱ्या जगाचं पोट भरण्यासाठी आपला घाम गाळतो, कष्ट करून जीवाचं रान करतो. पण जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी राजावरच उपाशीपोटी झोपायची वेळ सध्या आलीय. 

विठ्ठला. आमची शेतकऱ्याची जात हाय. स्वतःच्या कष्टाचंच आम्ही खातो. फुकट काही मिळायची आमची अपेक्षा पण नसतेय अन तसलं आम्हाला पचनी पण पडत नाही. पण काबाडकष्ट करून, मातीत पैसा ओतून जो शेतमाल आम्ही पिकवतो त्यााला जर किमान बाजारभाव भेटला नाही अन नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमालाचे नुकसान झाले तर मात्र आम्ही कुणाकडे मदतीची याचना करायची? कुणाकडे पदर पसरायचा?

विठ्ठला तुझ्या दारात भक्ताला जात, पात, धर्म, रंग नसतो तसाच शेतकऱ्याच्या कपाळावरही फक्त शेतकरीच लिहिलेलं असतं. तेव्हा पांडुरंगा, राजकारण बाजूला ठेऊन सरकारला कर्जमाफीचा निर्णय देण्याची सदबुद्धी दे अशी तुझ्याकडे प्रार्थना, असे बच्चू कडू यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

Web Title: bachchu kadu post on ashadhi ekadashi 2025 give the government the wisdom to waive off loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.