Babanrao Taywade: ओबीसींच्या जागा कमी झाल्या, महासंघ जाणार हायकोर्टात: बबनराव तायवाडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 11:06 IST2025-11-16T11:03:54+5:302025-11-16T11:06:56+5:30
डॉ. तायवाडे यांनी शनिवारी रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत त्यांना निवेदनही दिले.

Babanrao Taywade: ओबीसींच्या जागा कमी झाल्या, महासंघ जाणार हायकोर्टात: बबनराव तायवाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण देताना राज्य निवडणूक आयोगाने एससी, एसटी, महिलांच्या बाबतीत अपूर्णांक संख्या नजीकच्या पूर्ण संख्येत मोजण्याची सूट दिली. पण, हीच पद्धत ओबीसीसाठी विचारात घेणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे बहुतांश ठिकाणी ओबीसींची एक जागा कमी होत आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून ओबीसींवर हा अन्याय आहे. या विरोधात सोमवारी उच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल, असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी सांगितले. राज्यातील मुंबईसह नागपूर महापालिकेची आरक्षण सोडत रद्द करावी. नव्याने आदेश काढावा व नव्याने पूर्णांक संख्या गृहीत धरून आरक्षण काढावे. डॉ. तायवाडे यांनी शनिवारी रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत त्यांना निवेदनही दिले.
नागपूरमध्ये ओबीसींना मिळाली एक जागा कमी
नागपूर महापालिकेत १५१ जागा आहेत. २७ टक्के ओबीसी आरक्षण धरले तर ४०.७७ जागा येतात. त्यामुळे ओबीसीसाठी ४१ जागा यायला हव्यात. पण प्रत्यक्षात ४० जागा दिल्या आहेत. एससी, एसटी व महिलांच्या बाबतीत ०.५० टक्क्यांपुढे असेल तर पुढचा पूर्णांक आकडा पकडला जातो. पण ओबीसींच्या बाबतीत तसे केले नाही. बहुतांश ठिकाणी आरक्षण सोडतीत ओबीसींची एक जागा कमी झाली आहे.