‘खरातसोबत निघणा अनेकांची वरात, २०० व्हिडीओ, त्यातील ९०...; अनेक मंत्री, अधिकाऱ्यांचाही समावेश’, वडेट्टीवार यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 19:55 IST2026-03-22T19:54:35+5:302026-03-22T19:55:33+5:30
Ashok Kharat Case: अशोक खरातबरोबर बऱ्याच जणांची वरात निघणार आहे. तसेच या प्रकरणाचे जवळपास २०० व्हिडिओ आहेत. त्याची माहिती आहे. त्यामधील ९० व्हिडिओ आक्षेपार्ह आहेत. त्यात अनेक मंत्री, आयएएस आणि आयपीएस अधिकारी आहेत, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

‘खरातसोबत निघणा अनेकांची वरात, २०० व्हिडीओ, त्यातील ९०...; अनेक मंत्री, अधिकाऱ्यांचाही समावेश’, वडेट्टीवार यांचा दावा
सध्या राज्यात गाजत असलेल्या भोंदू ज्योतिषी अशोक खरातने केलेल्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये रोज नवनवे गौप्यस्फोट होत आहेत. यादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी एक धक्कादायक दावा केला आहे. अशोक खरातबरोबर बऱ्याच जणांची वरात निघणार आहे. तसेच या प्रकरणाचे जवळपास २०० व्हिडिओ आहेत. त्याची माहिती आहे. त्यामधील ९० व्हिडिओ आक्षेपार्ह आहेत. त्यात अनेक मंत्री, आयएएस आणि आयपीएस अधिकारी आहेत, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
या प्रकरणी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, अशोक खरातबरोबर आता बऱ्याच जणांची वरात निघणार आहे, खूप जण त्यात अडकले आहेत. आता जे काही समोर येत आहे ते पाहता कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असे मी म्हणेन. ही जी भोंदूगिरी चालली आहे. बनवाबनवी चालली आहे. विशेषकरून ओबीसींना मूर्ख बनवण्याचा जो धंदा चालला आहे, हे सगळे धंदे सरकार पुरस्कृत आहेत की काय? असा प्रश्न कधीकधी मला पडतो.
या प्रकरणात सरकारचे एवढे मंत्री त्यामध्ये अडकले असताना सरकारकडून कुठलीच कारवाई केली जात नाही, दखल घेतली जात नाही. महिला आयोगासारख्या जबाबदार पदावर असलेल्या नेत्यांकडून अशा किळसवाण्या व्यक्ती सोबत बघतो, हे फार विदारक आहे. या भोंदूगिरीला खतपाणी घालणारे सरकार याला जबाबदार आहे, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, या खरातचं काय करायचं हे आम्ही उद्या सभागृहात पाहणार आहोत. अशोक खरातच्या प्रकरणात कोणाकोणाचे मोहरे अडकले आहेत. ज्यांच्या हातात जनतेच्या विकासाची दोरी दिली, हे मात्र अशा भोंदू बाबांना घेऊन ज्योतिषाची दोरी ओढत आहेत. याची त्यांना लाज वाटायला पाहिजे. आपण कुठल्या पदावर आहोत. कुठली शपथ घेतली. कुठल्या संविधानामुळे आपण या पदावर आहोत, हे सर्व विसरून देश उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपाकडून ही भोंदूगिरी पोसली जात आहे. याला भाजपा आहे. तसेच महाराष्ट्र उद्ध्वस्त होण्यामागे भाजपा आहे.
विजय वडेट्टीवार यांनी पुढे या प्रकरणी आणखी एक धक्कादायक दावा केला. ते म्हणाले की, या प्रकरणाचे जवळपास २०० व्हिडिओ आहेत. त्याची माहिती आहे. त्यामधील ९० व्हिडिओ आक्षेपार्ह आहेत. त्यात अनेक मंत्री, आयएएस आणि आयपीएस अधिकारी आहेत. मोठमोठ्या हुद्द्यावर असलेले अधिकारी आहेत. या सर्वांची गच्छंती झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आम्ही अंधश्रद्धेविरोधात कायदा आणला होता. मात्र अंधश्रद्धा पसरवणारे मंत्री जर पदावर असतील तर त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. तो नैतिक अधिकार त्यांनी गमावला आहे, असेही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सुनावले.