Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 09:22 IST2025-11-07T09:20:43+5:302025-11-07T09:22:27+5:30
Anna Hazare Reaction On Parth Ajit Pawar Land Scam: एक अण्णा हजारे कुठे-कुठे बघणार? सरकारने कठोर पावले उचलली पाहिजेत, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
Anna Hazare Reaction On Parth Ajit Pawar Land Scam: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून १,८०० कोटींचे बाजारमूल्य असणारी जमीन केवळ ३०० कोटींमध्ये खरेदी करण्यात आली. या खरेदी व्यवहारात शासनाची १५२ कोटींची फसवणूक फसवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खरेदी व्यवहारात केवळ ५०० रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे. यात सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आले आहे. यावरून राजकीय राळ उठली असून, अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्ष करत आहेत. याप्रकणात आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उडी घेतली असून, पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
पार्थ अजित पवार जमीन घोटाळा प्रकरणाबाबत पत्रकारांशी बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, भारतासारख्या देशात निवडणुकांमधून चांगल्या माणसांनी पुढे जावे. समाज आणि देश डोळ्यासमोर ठेवून पुढे जायला हवे. अशा ठिकाणी हे घडत आहे, हे दुर्दैव आहे. एक अण्णा हजारे कुठे-कुठे बघणार, अशी विचारणा अण्णा हजारे यांनी केली. मंत्र्यांची मुले अशी वागत असतील, तर मंत्र्यांचा दोष आहे. संस्कार महत्त्वाचे असतात. मानवी जीवन जे मिळाले आहे, ते कशासाठी मिळाले आहे. फक्त खायचे, प्यायचे, चैन करून मरायचे, एवढ्यासाठी जीवन नाही. सरकारने धोरणे अवलंबली पाहिजेत, कठोर पावले उचलली पाहिजेत, अशी अपेक्षा अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.
घराचे, कुटुंबाचे संस्कार महत्त्वाचे
संस्कार हे महत्त्वाचे असतात. एखादा व्यक्ती घडण्यासाठी कुटुंबाचे संस्कार, घराण्याचे संस्कार, गावाचे संस्कार, समाजाचे संस्कार हे खूप महत्त्वाचे असतात. राळेगण सिद्धी किती मोठं गाव आहे, पण कधीही गडबड नाही. गोंधळ नाही. पार्थ पवार यांच्या प्रकरणात कारवाई झाली पाहिजे. असले प्रकार केवळ कारवाईने थांबणारे नाहीत. अशा प्रकरणांविरोधात कारवाई करण्यासाठी सरकारने विशेष धोरणे आखून त्याचा अवलंब केला पाहिजे. या प्रकरणाविरोधात कठोर पावले उचलली पाहिजेत. असे वागणाऱ्या लोकांना कडक शासन केले पाहिजे, अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली.
दरम्यान, पुण्यातील कथित जमीन व्यवहार प्रकरणाशी आपला दुरान्वयानेही संबंध नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. परंतु, त्याचवेळी मागे तीन-चार महिन्यांपूर्वी अशा प्रकारच्या गोष्टींची चर्चा ऐकली होती आणि त्यावेळीच मी स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, कोणतेही चुकीचे व्यवहार मला मान्य नाहीत. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत, त्यानुसार ती चौकशी जरूर व्हावी आणि सत्य काय आहे ते समोर यावे, असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.