संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांचा युक्तिवाद अंजली दमानियांना खटकला; म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 14:08 IST2025-03-27T14:07:53+5:302025-03-27T14:08:33+5:30
Beed Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी केले पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.

संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांचा युक्तिवाद अंजली दमानियांना खटकला; म्हणाल्या...
Beed Santosh Deshmukh Case: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सुनावणीला सुरुवात झाली असून या प्रकरणातील दुसरी सुनावणी कोर्टात पार पडली. यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणात सुरुवातपासून नेमके काय घडले आणि कोणत्या आरोपीचा काय रोल आहे, याची माहिती कोर्टासमोर मांडली. तसेच दुसरीकडे या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या सुदर्शन घुले याच्यासह जयराम चाटे आणि महेश केदार या तिघांनी पोलिसांकडे हत्येची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद खटकल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट: सुदर्शन घुलेसह तिघांच्या कबुलीने केस निर्णायक टप्प्यावर
आता हे प्रकरण आरोप निश्चितीसाठी तयार असल्याचे उज्ज्वल निकम म्हणाले. मात्र कागदपत्रे न मिळाल्याने आरोप निश्चित करण्यात येऊ नये, अशी विनंती आरोपींच्या वकिलांनी केली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे. दुसरीकडे, पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागण्यात संतोष देशमुख हे मुख्य अडथळा होते. तसेच प्रतिक घुलेच्या वाढदिवशीच त्यांनी आणि मस्साजोग गावातील ग्रामस्थांनी पवनचक्की कंपनीच्या बाहेर आम्हाला मारहाण केली. त्याचे व्हिडिओ व्हायरल केल्याने आम्ही हे पाऊल उचलले, अशी कबुली सुदर्शन घुले याने दिल्याची माहिती आहे. देशमुख यांच्या हत्येआधी हॉटेल तिरंगा इथे विष्णू चाटेसोबत बैठक घेतल्याचेही घुलेने कबुल केले.
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांचा युक्तिवाद अंजली दमानियांना खटकला
तत्पूर्वी मीडियाशी बोलताना अंजली दमानिया यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. मला आता एकच अडथळा वाटतो. उज्ज्वल निकम कोर्टात म्हणाले की, टोळीचा मुख्य सुदर्शन घुले आहे. पण संतोष देशमुख यांची हत्या वाल्मीक कराडच्या सांगण्यावरुन झाली आहे. पण तरीही टोळीचा म्होरक्या सुदर्शन घुले याला दाखवणे, ही गोष्ट खटकणारी आहे. हा एकच मुद्दा मला खटकला, असे अंजली दमानिया यांनी सांगितले. तसेच गुन्हेगारी कायद्यात कबुलीजबाब फार महत्त्वाचा असतो. आरोपीने कबुलीजबाब दिला असेल तर त्याला दोषी ठरवणे सोपे असते. आरोपीने पोलिसांसमोर दिलेला जबाब ग्राह्य धरला जात नाही. परंतु, न्याय दंडाधिकाऱ्यांसमोरचा जबाब ग्राह्य धरला जातो. संतोष देशमुख प्रकरणात आरोपींचे कबुलीजबाब त्या पद्धतीने नोंदवले असतील तर ही योग्य गोष्ट आहे. त्यामुळे आता सगळे सोपे झाले आहे, असे दमानिया यांनी म्हटले आहे.
दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी केले पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. या घटनेत अनेक लोकांनी पडद्यामागून मदत केली आहे. बालाजी तांदळे, शिवलिंग मोरळे, डॉ. वायबसे, राजेश पाटील, प्रशांत महाजन यापैकी कोणाचे नाव आरोपपत्रात नाही. या सगळ्यांना सहआरोपी केले पाहिजे. या सगळ्यांना व्हॉटसॲपवरुन गाईड करणारे धनंजय मुंडे होते, असा मोठा दावा अंजली दमानिया यांनी यावेळी बोलताना केला आहे. तसेच या सगळ्यांना सहआरोपी करुन त्यांचे फोन जप्त केले तर या प्रकरणाचे धागेदोरे धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पोहोचतील, असे अंजली दमानिया यांनी म्हणाल्या.