अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 15:07 IST2025-10-05T15:06:38+5:302025-10-05T15:07:26+5:30
अनिल परब कोण आहे, केवळ उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी असे आरोप केले जात आहेत. परबांनी केलेले आरोप धादांत खोटे आहेत असंही रामदास कदमांनी म्हटलं.

अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
मुंबई - अनिल परब भ्रष्ट माणूस आहे. बिल्डरांकडून पैसे खाऊन मराठी माणसांना मुंबई बाहेर काढले. माझ्याकडे सगळी कागदपत्रे आलीत. वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून सरकारी पैसा कसा लुबाडायचा हे काम परबाचे आहे. ३७ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेवरून माझ्यावर गंभीर आरोप केले. स्टोव्हचा भडका उडाला, त्यात ती जळाली. छोट्या मुलीने मला सांगितले तेव्हा मी पत्नीला वाचवले. कुणाच्या पत्नीबाबत चुकीचं पसरवण्याचं काम चांगला माणूस करू शकत नाही. हा नीच माणूस आहे अशा शब्दात माजी मंत्री रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला.
रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत अनिल परबांवर हल्लाबोल केला. कदम म्हणाले की, अनिल परब हे बदनामी करणारे आरोप आमच्यावर करत आहे. उद्धव ठाकरे एका भ्रष्ट माणसाला सोबत घेऊन जात आहेत. मी फक्त संशय निर्माण केला होता. जेव्हा बाळासाहेब ठाकरे गेले तेव्हा लोकांसमोर मी ते जाहीर केले. ज्या खोलीत बाळासाहेब ठाकरे होते, तिथे कुणालाही शेवटचे २ दिवस जायला परवानगी नव्हती. मी तिथेच होतो. काही मोजकेच तिथे जात होते. नेत्यांनाही तिथे जायची परवानगी नव्हती. त्यामुळे मी संशय व्यक्त केला. या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली. उद्धव ठाकरे यांनी यावर बोलायला हवे होते. अनिल परब आहे कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच अनिल परब यांनी बनवलेल्या मृत्यूपत्रावर जयदेव ठाकरे यांनी न्यायालयात प्रश्न उपस्थित केले होते. बाळासाहेब ठाकरेंची स्वाक्षरी खोटी होती, ती सही दुसऱ्याने केली होती असा संशय होता. अनेक गोष्टी आम्हाला माहिती आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्याकडेही बोलले आहेत. माझं तोंड उघडायला लावू नका. माझ्याकडे बऱ्याच फाईल आल्या आहेत. आम्ही कुणावर आजपर्यंत अन्याय केला नाही. जेव्हा शिवसेना संकटात होती, तेव्हा आम्ही पक्षाला वाचवले. मला पुढच्या सीटवर बसवून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडायचे. अनिल परब कोण आहे, केवळ उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी असे आरोप केले जात आहेत असंही रामदास कदमांनी म्हटलं.
अनिल परबांनी केलेले आरोप चुकीचे - ज्योती कदम
दरम्यान आजच्या पत्रकार परिषदेत रामदास कदम यांनी पत्नी ज्योती रामदास कदम यांनाही पत्रकारांसमोर आणले. पत्नीला वाचवताना माझेही हात भाजले होते तेदेखील कदम यांनी माध्यमांना दाखवले. मी माझ्या पत्नीला वाचवले याचा अभिमान आहे. बाळासाहेब ठाकरे जसलोकमध्ये दोन वेळा पाहायला आले होते. अनिल परब माझ्यावर धादांत खोटे आरोप करत आहेत. या पत्रकार परिषदेत ज्योती रामदास कदम यांनीही १९९३ साली घडलेल्या घटनेची आठवण सांगितली. काल परब यांनी जे आरोप आमच्या कुटुंबावर केले, साहेबांवर केले ते फार चुकीचे आहेत. त्यावेळी घरी स्टोव्ह होता, त्यातून ही दुर्घटना घडली. मी उभी असताना तो पदर आगीवर पडला, त्याठिकाणी स्टोव्हचा स्फोट झाला. तेव्हा साहेबांनी मला आधी कांदिवलीच्या रुग्णालयात नेले, तिथून जसलोकला हलवले. २ महिने माझ्यावर तिथे उपचार सुरू होते. माझ्या बाजूच्या रूममध्ये साहेब होते, ते असे करणे शक्य नाही. आग लावली असती तर त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला नसता. मला अमेरिकेपर्यंत उपचारासाठी नेले होते. हे राजकारण चुकीचे आहे. मी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आली. हे आरोप चुकीचे झाले त्यामुळे मला माध्यमांसमोर यावे लागले असं ज्योती रामदास कदम यांनी सांगितले.