Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 15:19 IST2025-11-25T15:18:40+5:302025-11-25T15:19:44+5:30
Anant Garje News Marathi: पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे याच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी आत्महत्या केली. या प्रकरणावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
Rupali Patil Thombare Anant Garje News: "नवऱ्यावर, सासूवर तसेच नणंद यांच्यावर गुन्हा दाखल झालाय; त्याचप्रमाणे जिच्या सोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध होते त्या महिलेला सुद्धा गुन्ह्यात आरोपी करणे गरजेचे आहे", अशी मोठी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे. डॉक्टर गौरी पालवे यांच्या आत्महत्या प्रकरणी रुपाली ठोंबरे यांनी एक पोस्ट करत भूमिका मांडली आहे.
रुपाली पाटील ठोंबरे यांनी अनंत गर्जेची पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांच्या आत्महत्या प्रकरणाबद्दल म्हटले आहे की, "अशा घटना अत्यंत दुर्देवीच असतात. डॉक्टर गौरी यांच्या वडिलांचा आक्रोश पहिला. श्रीमंताला पोरी देवू नका असे म्हणत ओक्साबोक्सी रडत होते. एक बाप हतबल होता."
पुढे रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले आहे की, "पण घरातील माणूस आत्महत्या केल्यावर हे कळण्यापेक्षा आधीच घरातील लोकांनी संवाद, समन्वय असणे फार फार महत्त्वाचे आहे. मुळामध्ये मुलींना सक्षम बनून त्यांची मानसिक स्थिती ही माहेरचे किंवा सासरचे दोघांकडे एक समंजस पणाचं वागणे हे फार महत्त्वाचे आहे."
त्या महिलेलाही आरोपी करा
"डॉक्टर जरी असली तरी त्या सिच्युएशनला या नवरा बायकोच्या भांडणांमध्ये नवऱ्याचे एक्स्ट्रा मॅरिटीयल अफेअर यावरून झालेले वाद हे फार महत्त्वाचे आहे. नवऱ्यावर, सासूवर तसेच नणंद यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याचप्रमाणे जिच्यासोबत एक्स्ट्रामॅरिटीयल अफेअर होतं, त्या महिलेला सुद्धा गुन्ह्यात आरोपी करणे गरजेचे आहे", असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले आहे.
'त्याशिवाय अनैतिक संबंध ठेवण्याचे धाडस करणार नाही'
"एक घर, एक महिला उभे करू शकते तसेच ती महिला एखाद्याचे घर संपवण्याचे कारण बनू शकते. अशा बेकायदेशीर संबंध, कृत्य करणाऱ्या, अनैतिक संबंध ठेवणाऱ्या महिलांवर सुद्धा गुन्हा दाखल केलाच पाहिजे. त्याशिवाय कुटुंब वाचणार नाहीत. कुटुंब सुरक्षित राहणार नाहीत. अनैतिक संबंध करण्याचे धाडस करणार नाही. यामुळे कुटुंब वाचतील", असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले आहे.
ती महिला मोकाट राहता कामा नये -रुपाली पाटील ठोंबरे
"पत्नी तिच्या नवऱ्याचे अनैतिक संबंध आहेत म्हणून आत्महत्या करते, तेव्हा नवऱ्यावर त्याच्या घरातील लोकांवर गुन्हा दाखल होतो पण खरी जी गुन्हेगार आहे. अनैतिक संबंध ठेवणारी महिला मोकाट राहता कामा नये. बाकी यावर सविस्तर बोललेच. अजून एक जाता जाता कितीही संकट, भांडण झाले तरी आत्महत्या पर्याय नाही. त्यामुळे आत्महत्या कोणीही करूच नये", असे आवाहनही रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले आहे.