अमित शहा उद्या संघ भेटीसाठी नागपुरात

By Admin | Updated: July 17, 2014 01:08 IST2014-07-17T01:08:38+5:302014-07-17T01:08:38+5:30

भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे शुक्रवारी नागपुरात येत आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

Amit Shah to visit Nagpur tomorrow | अमित शहा उद्या संघ भेटीसाठी नागपुरात

अमित शहा उद्या संघ भेटीसाठी नागपुरात

नागपूर : भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे शुक्रवारी नागपुरात येत आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत अमित शहा यांना उत्तर प्रदेश प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वात भाजपला घवघवीत यश मिळाले. केंद्रात मोदी सरकार येताच अमित शहा यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. त्यानंतर प्रथमच शहा हे नागपुरात येऊन संघदरबारी हजेरी लावणार आहेत. शहा यांचे शुक्रवारी सकाळी ११ वाजता नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर आगमन होईल. विमानतळावर शहर भाजपतर्फे त्यांचे जंगी स्वागत होईल. त्यानंतर ते प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जातील. तेथून दीक्षाभूमीवर जाऊन दर्शन घेतील. यानंतर रेशीमबाग येथे स्मृती मंदिरात जातील व शेवटी संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन चर्चा करतील. सायंकाळी ६ वाजता ते दिल्ली येथे परततील. (प्रतिनिधी)
पदाधिकाऱ्यांची शहा
यांच्याशी चर्चेची इच्छा

अमित शहा यांच्याशी एक बैठक घेऊन काही वेळ चर्चा करायला मिळावी, अशी इच्छा नागपूर शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली आहे. शहा यांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे अशी स्वतंत्र चर्चा होण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, शहा लवकरच पुन्हा एकदा नागपुरात पदाधिकाऱ्यांशी चर्चेसाठी येतील, असे पक्षाकडून सांगितले जात आहे.

Web Title: Amit Shah to visit Nagpur tomorrow