अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 10:31 IST2025-10-05T10:28:11+5:302025-10-05T10:31:21+5:30
रात्री दहाच्या सुमारास अमित शाह हॉटेलमध्ये दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे तिन्ही प्रमुख नेते हजर होते.

अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
प्रमोद आहेर/ सचिन धर्मापुरीकर
शिर्डी - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे काल रात्री उशिरा येथील हॉटेल सन अँड सनमध्ये आगमन झाले. प्रवरानगर आणि कोपरगाव येथे आज होणाऱ्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांच्या पूर्वसंध्येला शाहांचे झालेले हे आगमन आणि त्यानंतर मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी झालेली सुमारे पाऊण तास चाललेली बंद खोलीतील चर्चा, याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. आजच्या सभेत शाह पूरग्रस्त महाराष्ट्रासाठी मोठे पॅकेज जाहीर करण्याची दाट शक्यता असल्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
रात्री दहाच्या सुमारास अमित शाह हॉटेलमध्ये दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे तिन्ही प्रमुख नेते हजर होते. त्यांच्यासोबतच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, जयकुमार गोरे, बाबासाहेब पाटील आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचीही उपस्थिती लक्षणीय होती.
'त्रिकुटा'सोबत शाहांची दोन तास चर्चा
सर्वात महत्त्वाचा राजकीय घटनाक्रम यानंतर घडला. अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व अजित पवार यांच्याशी बंद खोलीत सुमारे पाऊण तास चर्चा केली. राज्यातील सत्तास्थापनेनंतर अनेक दिवसांनी प्रथमच हे 'राजकीय त्रिकूट' अमित शाह यांच्यासोबत एकत्रितपणे इतका वेळ चर्चा करत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत राज्यातील सध्याची राजकीय स्थिती, आगामी निवडणुकांचे नियोजन, तिन्ही पक्षांमधील समन्वय आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पूरग्रस्त महाराष्ट्रासाठी केंद्राकडून मिळणाऱ्या भरीव मदतीच्या पॅकेजवर सखोल चर्चा झाली. आजच्या सभेत अमित शाह हे पॅकेज जाहीर करतील, अशी शक्यता वर्तवली जात असल्याने या चर्चेला विशेष महत्व आहे. पॅकेजची रूपरेषा आणि अंमलबजावणीच्या धोरणांवर या बैठकीत खल झाला असण्याची शक्यता आहे.
जेवणाच्या टेबलवर पुढील रणनीतीवर संवाद
बंद खोलीतील चर्चा संपल्यानंतर गृहमंत्री शाह यांच्याशी चर्चेनंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जेवणाच्या टेबलवर अन्य उपस्थित मंत्र्यांशी संवाद साधला. या संवादात प्रामुख्याने आजच्या सभेतील नियोजित कार्यक्रम आणि भाषणांची आखणी झाली असणार. एकंदरीत, अमित शाह यांच्या या रात्रीच्या आगमनाने आणि मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या पाऊण तासांच्या 'हाय-लेव्हल' चर्चेने राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या सभेकडे केवळ राज्याचेच नव्हे, तर देशाचे लक्ष लागले आहे.