अमित साळुंखेला अटक, शिंदेसेनेच्या मंत्र्यांवर वेगवेगळे आरोप; यामागे महाशक्तीची करणी नाही ना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 13:56 IST2025-07-28T13:54:32+5:302025-07-28T13:56:59+5:30
Shiv Sena Shinde Group: आताच्या घडीला शिंदेसेनेच्या मंत्री, नेत्यांवर विविध आरोप होताना पाहायला मिळत आहेत.

अमित साळुंखेला अटक, शिंदेसेनेच्या मंत्र्यांवर वेगवेगळे आरोप; यामागे महाशक्तीची करणी नाही ना!
Shiv Sena Shinde Group: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात अनेकविध गोष्टी घडत आहेत. दर आठ-पंधरा दिवसांनी होणारे शिंदेसेनेतील प्रवेश गेल्या काही दिवसांपासून थांबले असल्याची चर्चा आहे. विशेषतः मुंबईतील माजी नगरसेवकांची पक्ष भरती थांबली असून, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या शक्यतेमुळे मुंबईतील पक्षप्रवेशांना ओहोटी लागल्याची चर्चा सुरू आहे. यातच शिंदे गटातील मंत्र्यांवर विविध आरोप होताना पाहायला मिळत आहे. यावरूनही राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
झारखंडमधील दारू घोटाळ्यात सुमित फॅसिलीटीचे संचालक अमित साळुंखे यांना लाचलुचपत पथकाने रांचीमध्ये अलीकडेच अटक केली. अमित साळुंखे छत्तीसगडमधील मद्य व्यावसायिक सिद्धार्थ सिंघानियाचा निकटवर्तीय आहे. सिंघानियांच्या चौकशीतून अमित साळुंखेवर एसीबीने अटकेची कारवाई केली. महाराष्ट्रात मागे ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा झाला त्यातही त्याचा समावेश आहे. १०८ रुग्णवाहिकेबाबत संशयास्पद निविदा आणि घोटाळे समोर आले. त्या रुग्णवाहिकेचे कंत्राट साळुंखेला देण्यात आले होते, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अमित साळुंखेला झालेली अटक, मंत्र्यांवर होणारे वेगवेगळे आरोप, यामुळे शिंदेसेनेच्या मागे ससेमिरा लागल्याचे पाहायला मिळत आहे.
यामागे महाशक्तीची करणी तर नाही ना !
शिवसेनेत उठाव केला तेव्हा एकनाथ शिंदे यांनी आपल्या मागे महाशक्ती असल्याची कबुली दिली होती. त्याच जोरावर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले. आता मुख्यमंत्रीपद सूत्रे भाजपाकडे असताना शिंदेसेनेच्या मंत्र्यांवर वेगवेगळे आरोप होत आहेत. झारखंडमधील मद्य घोटाळ्यात सुमित फॅसिलिटीज् या कंपनीचा संचालक अमित साळुंखेला अटक झाली. या कंपनीला ठाणे जिल्ह्यातील महापालिकांमध्ये कचरा सफाईची कामे मिळाली आहेत. यामुळे शिंदे यांच्यामागे मीडियाचा ससेमिरा लागणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे यामागेही महाशक्ती आहे की तेच त्यांना यातून बाहेर काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, महापालिका निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून पालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधुंची युती झाली तर त्याचा सर्वाधिक फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसू शकतो, असा अंदाज आहे. सध्या मराठीच्या मुद्द्यावर का होईना, ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या पक्षातून शिंदे यांच्या पक्षात गेलेल्या माजी नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. ठाकरे बंधूच्या एकत्र येण्यामुळे आधीच शिंदे यांच्या पक्षातील माजी नगरसेवकांमध्ये अस्वस्थता असताना आता शिंदे यांच्या पक्षातील आमदार वादात सापडले आहेत. राजकीय कोंडी होऊ लागल्यामुळे ही अस्वस्थता वाढू लागली असल्याची कुजबुज सुरू आहे.