शिंदे गटातील नेते संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांचे वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. बंद दाराआड झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी पक्षातील नेत्यांना शिस्त पाळण्याचे आवाहन केले आणि त्यांना कारवाई करण्यास 'भाग पाडू नये, असा इशारा दिला. यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. "एकनाथ शिंदे पण त्यातलेच आहेत, हे बडे मिया आणि ते छोटे मिया", अशा शब्दांत अंबादास दानवे यांनी टीका केली.
"एकनाथ शिंदे हे संजय गायकवाड आणि संजय शिरसाठांना काय समज देतील, ते पण त्यातलेच आहेत. ते बडे मिया आहेत तर, हे छोटे मिया आहेत. महाराष्ट्राला लुटणारी ही टोळी आहे", असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
नेमकं प्रकरण काय?संजय गायकवाड यांनी निकृष्ट जेवणासाठी आमदार निवासस्थानातील कॅन्टीन मॅनेजरला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर सरकारमधील मंत्री संजय शिरसाट यांचाही एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओत एका पलंगावर बसून शिरसाट सिगारेट ओढत असून त्यांच्या शेजारी पैशांनी भरलेली बॅग दिसत आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?कार्यकर्त्यांनी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आपण एका कुटुंबासारखे आहोत. तुमची बदनामी ही माझी बदनामी आहे. चुकीच्या गोष्टींवर तुमचा वेळ वाया घालवू नका, कमी बोला आणि जास्त काम करा. जर कुणी बेजबाबदार वर्तन केले तर, त्यांना आपले पदही गमवावे लागू शकते. मला आपल्या माणसांविरोधात कारवाई करायला आवडणार नाही, पण जर असे बेजाबदार कृत्य चालू राहिले तर पावले उचलावी लागतील, असाही त्यांनी इशारा दिला.