आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 05:57 IST2025-09-28T05:56:40+5:302025-09-28T05:57:36+5:30
काही ठिकाणी २०० मिमीहून अधिक पावसाचा अंदाज

आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
मुंबई : बंगालच्या उपसागरातून पुढे सरकलेले कमी दाबाचे क्षेत्र सौराष्ट्रकडे आगेकूच करत असून, हवामानातील या बदलामुळे रविवारी मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी २०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात असलेली पूरस्थिती आणखी बिकट होण्याची भीती आहे.
रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसरात रविवारी रेड अलर्ट, तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसह सातारा घाट व कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने सांगितले. 'सचेत अॅप'च्या माध्यमातून नागरिकांना सतर्कतेच्या पूर्वसूचना देण्यात येत असून हवामान विभाग आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र या केंद्रीय संस्थांसोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे.
आज कुठे 'अलर्ट'?
रेड : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे आणि नाशिक जिल्ह्याचा घाटमाथ्याचा परिसर
ऑरेंज : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोल्हापूरचा घाटमाथ्याचा परिसर
सोमवारी 'रेड अलर्ट'
पालघर आणि नाशिकचा घाटमाथ्याचा परिसर