आता मनसोक्त खा भाकरी, रेशनवर मिळणार ज्वारी; 'या' बारा जिल्ह्यांना धान्य उचल करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 18:37 IST2025-09-10T18:36:44+5:302025-09-10T18:37:38+5:30

जिल्ह्यासाठी किती क्विंटलची आहे तरतूद.. जाणून घ्या 

Along with wheat sorghum will also be available on ration from the government | आता मनसोक्त खा भाकरी, रेशनवर मिळणार ज्वारी; 'या' बारा जिल्ह्यांना धान्य उचल करण्याचे आदेश

आता मनसोक्त खा भाकरी, रेशनवर मिळणार ज्वारी; 'या' बारा जिल्ह्यांना धान्य उचल करण्याचे आदेश

सातारा : राज्यात अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांत ज्वारीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले आहे. त्यामुळे यंदा शासनाकडून रेशनवर गव्हाबरोबरच ज्वारीही मिळणार असून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे ३७,२६० क्विंटल नियतन सातारा जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना रुचकर चपातीबरोबरच पौष्टिक भाकरीची चवही घेता येणार आहे.

सातारा जिल्ह्यात अंत्योदय गटाचे २७ हजार ३ कार्डधारक आहेत, तर प्राधान्य गटाचे १६ लाख ८६ हजार ९२४ लाभार्थी आहेत. यातील अंत्योदय लाभार्थ्यांना नियमितपणे प्रतिकार्ड १५ किलो गहू आणि २० किलो तांदूळ देण्यात येते, तर प्राधान्य गटात प्रति माणसी २ किलो गहू आणि तीन किलो तांदूळ देण्यात येते. आता शासनाने यात बदल केला असून गव्हासोबत ज्वारीही देण्यात येणार आहे.

त्यानुसार अंत्योदय गटात प्रति कुटुंबांना गहू ८ किलो, ज्वारी ७ किलो आणि तांदूळ २० किलो देण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत प्रति माणसी १ किलो गहू, १ किलो ज्वारी आणि ३ किलो तांदूळ असे वाटप होणार आहे. पोषणमूल्यांनी समृद्ध अशी ज्वारी आता थेट स्वस्त धान्य दुकानातून उपलब्ध होणार असून सातारा जिल्ह्यात प्रथमच असा निर्णय झाला आहे.

सातारा जिल्ह्याला ३७,२६० क्विंटल उचल करण्याचे आदेश

सातारा जिल्ह्यासाठी रेशनवर देण्याकरिता ३७,२६० क्विंटल ज्वारीची उचल जळगाव जिल्ह्यातील नांदुरा येथील गोदामातून करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अन् पौष्टिक ज्वारी महागली

तीन दशकांपूर्वी ज्वारीचे दर कमी तर गहू महाग असायचा. त्यामुळे गरिबांच्या ताटात भाकरी असायची. मात्र, ज्वारीबाबत संशोधन होऊन आरोग्याचे फायदे समोर आल्यानंतर ज्वारीला मागणी वाढली. त्यामुळे हे भरडधान्य महागले. तथापि, सर्वसामान्यांनाही रेशनवर ही ज्वारी उपलब्ध होणार आहे.

असे असेल वाटप

योजना  -  गहू  -  तांदूळ - ज्वारी
अंत्योदय - ८ किलो प्रतिकार्ड - २० किलो प्रतिकार्ड - ७ किलो प्रतिकार्ड
प्राधान्य कुटुंब - १ प्रती व्यक्ती -  ३ किलो प्रती व्यक्ती - १ प्रति व्यक्ती

या बारा जिल्ह्यांना धान्य उचल करण्याचे आदेश

जिल्हा - ज्वारी (क्विंटल)

  • नांदेड - ४७४६०
  • परभणी - २८७५०
  • बीड - ३६७३०
  • धाराशिव - २६०२०
  • अहिल्यानगर - ६४८६०
  • लातूर - ३९५६०
  • सोलापूर - ४०२६०
  • सोलापूर एफडीओ - १०७६०
  • पुणे - ५६८८०
  • पुणे एफडीओ - २७४८०
  • सातारा - ३७२६०
  • सांगली -  ३९३००

शासनाच्या आदेशानुसार ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये गहू, तांदूळ, ज्वारी वाटप करायचे आहे. हे धान्य दुकानात पोहोच झाल्यानंतर पॉस मशीनद्वारे लाभार्थ्यांना वाटप करण्यात येईल. - श्रीकांत शेटे, जिल्हाध्यक्ष रेशन दुकानदार संघटना, सातारा

Web Title: Along with wheat sorghum will also be available on ration from the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.