चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपा कार्यकर्त्यांना तंबी; "सर्वांचे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 16:11 IST2025-10-24T16:11:16+5:302025-10-24T16:11:51+5:30
कोणत्या ग्रुपवर कोण काय मेसेज टाकतो, कोण काय बोलतो हे माझ्या वॉर रूम दररोज पाहतो. माझे इंटेलिजन्स तगडे आहे. पूर्ण माहिती आपल्याला मिळते, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलून दाखविले.

चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपा कार्यकर्त्यांना तंबी; "सर्वांचे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर..."
भंडारा - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुठेही बंडखोरी नको, जर बंडखोरी झाली आणि चुकीचं बटण दाबलं तर सत्यानाश होईल. जो कुणी बंडखोरी करेल त्याच्यासाठी आमचे दरवाजे ५ वर्षांसाठी बंद होतील असा इशारा देत भाजपा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुमच्या सर्वांचे व्हॉट्सअॅप सर्व्हेलन्सवर टाकलेत अशी तंबीच कार्यकर्त्यांना दिली. भंडारा येथील पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना बावनकुळे यांनी हे विधान केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगल्याच मानावर घेतल्याचे दिसते. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बावनकुळे यांनी अप्रत्यक्षपणे आपल्याच कार्यकर्त्यांना दम भरला. माझ्या लहान कार्यकर्त्याला कोणी हरवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यासाठी माझ्या घराची दारे पुढील पाच वर्षे बंद राहतील. शहरातील असा कोणताही व्हॉट्सअॅप ग्रुप नाही की ज्याच्यावर माझं लक्ष नाही. ज्यात माझी माणसं लक्ष ठेवून नाही. कोणत्या ग्रुपवर कोण काय मेसेज टाकतो, कोण काय बोलतो हे माझ्या वॉर रूम दररोज पाहतो. माझे इंटेलिजन्स तगडे आहे. पूर्ण माहिती आपल्याला मिळते, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलून दाखविले.
व्हॉट्सअॅप ग्रुपवर चंद्रशेखर बावनकुळे पाळत ठेवून आहेत की काय अशी चर्चा आता कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. बावनकुळेंशी पंगा नको म्हणून अनेकांनी सोशल मीडियावरील हालचाली थांबविले आहेत. बावनकुळेंच्या या वक्तव्याने विरोधी पक्षाला त्यांची कोंडी करण्यासाठी आणखी एक नवा मुद्दा मिळाला आहे. तिकीट न मिळाल्याच्या रागात आपण खडा तमाशा करतो, एक चुकीचे बटण दाबतो, त्यामुळे पक्षाचे नुकसान होते. एक नगरपालिका कमी झाली तर काही फरक पडणार नाही मात्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा बट्ट्याबोळ होतो. त्यामुळे जर कुणी बंडखोरी केली तर त्याच्यासाठी ५ वर्ष दार बंद राहतील हे लक्षात ठेवा असा दमच बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना भरला.
चंद्रशेखर बावनकुळे यांना अटक करा - संजय राऊत
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करून चौकशी केली पाहिजे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासगी लोक लावून लोकांचे फोन सर्व्हेलन्सवर लावलेत का, हा भाजपा कार्यकर्त्यांपुरता विषय नाही. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विरोधी पक्षातील लोक, नेते यांचे फोन ऐकले जातायेत. बावनकुळे, रवींद्र चव्हाण, मुंबईतील काही बिल्डर्स यांनी एकत्रित येऊन वॉर रूम उघडल्या आहेत. त्या माध्यमातून भाजपा विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप करत आहेत. हे बेकायदेशीर कृत्य आहे. खासगी जीवनात घुसण्याचा हा प्रयत्न आहे. बावनकुळे यांनी हे स्पष्ट केले आहे. २०१९ साली हे प्रकार उघडकीस आले तेव्हा आमच्या सरकारने गुन्हे दाखल केले होते. हा गुन्हा जर गंभीर असेल असं देवेंद्र फडणवीस यांना वाटत असेल तर त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना तात्काळ बरखास्त करून त्यांना अटक केली पाहिजे अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली.