भाजपच्या तिन्ही आमदारांचा आता शिंदेंच्या शिवसेनेला काटशह; पोलिस आयुक्तांची घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 14:07 IST2025-10-02T14:06:17+5:302025-10-02T14:07:42+5:30
Nashik Mahayuti: राजकीय गुन्हेगारी चर्चेत असतानाच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली होती.

भाजपच्या तिन्ही आमदारांचा आता शिंदेंच्या शिवसेनेला काटशह; पोलिस आयुक्तांची घेतली भेट
Nashik Politics : शहरात गुन्हेगारी वाढत असून त्यातच दोन गंभीर गुन्ह्यांत भाजपाच्या माजी नगरसेवकांना अटक झाली. त्यातच आणखी दोन खुनांचे आणि मोटारी फोडण्याचे प्रकार घडले. त्यामुळे राजकीय गुन्हेगारी चर्चेत असतानाच शिंदे सेनेचे नेते आणि शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली. त्यामुळे ही भाजपाला शह देण्याची चाल असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता भाजपाच्याही तिन्ही आमदारांनी बुधवारी (१ सप्टेंबर) पोलीस आयुक्तांची भेट घेऊन गुन्हेगारांवर अंकुश आणा, असे सांगून एक प्रकारे भुसे यांना प्रत्युत्तर देऊन काटशह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
गेल्या महिन्यात नाशिकमध्ये एकापाठोपाठ गुन्हेगारी घटना घडत गेल्या. त्यात भाजपाचे दोन माजी नगरसेवक अटकेत गेले. त्यानंतरही शहरात खून सत्र, लुटालूट सुरूच असून आरोपींचे राजकीय संबंध चर्चेत आहेत.
त्यामुळेच दादा भुसे यांनी पूरस्थिती बाजूला सारून आधी गुन्हेगारी या विषयावर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला. कारण गृहखाते हे भाजपाकडे आहे; त्यामुळे भाजपच्या आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, अॅड. राहुल ढिकले यांनी मुंबईत जाऊन आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट घेतली आणि लगेचच बुधवारी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली.
तरुणांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता व तिच्यामुळे होणारे गंभीर परिणाम लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात. शहरात अलीकडच्या काळात लूटमार, साखळी लूटमार, ओढणे, एटीएम फोडणे, अमली पदार्थांचा व्यापार, तरुणांमध्ये वाढते नशेचे प्रमाण अशा गंभीर समस्यांमुळे त्रस्त होत आहे.
यामुळे शहरातील गुन्हेगारीला चालना मिळत असून भविष्यात ही परिस्थिती धोकादायक ठरू शकते, त्यामुळे गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तिन्ही आमदार आणि शहराध्यक्ष सुनील केदार यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्याच्या आदेशानेच कारवाई
राज्यात सरकार भाजपचे आहे. गुन्हेगारांना हा पक्ष कधीही पाठीशी घालत नाही. भाजपच्या ज्या दोन माजी नगरसेवकांना पोलिसांनी अटक केली आहे, ती मुख्यमंत्र्यांच्या आदेशान्वये कारवाई झाली आहे. त्यांनी गुन्हेगारीत सहभाग घेतला, त्यांच्यावर कारवाई झाली. यामुळे त्या प्रकारचे राजकारण कोणी करू नये, असे आमदार देवयानी फरांदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.