राज्य सरकारपासून गेले काही दिवस फटकून राहणारे अजित पवार पुण्यात मात्र आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 06:18 PM2020-06-09T18:18:58+5:302020-06-09T18:29:16+5:30

राज्याच्या राजकारणात अजित पवार दिसत नाही अशी मागील काही दिवसांपासून चर्चा आहे...

Ajit Pawar, who has been ousted from the state government, is aggressive in Pune | राज्य सरकारपासून गेले काही दिवस फटकून राहणारे अजित पवार पुण्यात मात्र आक्रमक 

राज्य सरकारपासून गेले काही दिवस फटकून राहणारे अजित पवार पुण्यात मात्र आक्रमक 

Next
ठळक मुद्देपुणे जिल्ह्यातच बांधबंदिस्ती पक्की करून राज्यात पुन्हा आवाज करायचा असा कार्यकर्त्यांचा अंदाज

राजू इनामदार - 
पुणे: सरकारपासून गेले काही दिवस फटकून राहणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात मात्र पालकमंत्री म्हणून प्रशासनाला कामाला लावले आहे. रस्त्यांच्या रुंदीकरणासंबधी बहुमताच्या जोरावर निर्णय घेऊ नका, अशा शब्दात त्यांनी महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला खडसावले आहे. दोन दिवसांच्या मुक्कामात त्यांनी पुणे जिल्ह्याचा आढावा घेत काहीठिकाणी राजकीय बांधबंदिस्ती केली तर प्रशासकीय स्तरावरही काही अधिकाऱ्यांना कामाविषयी समज देत रिझल्ट पाहिजे म्हणून ठणकावले.  

राज्याच्या राजकारणात अजित पवार दिसत नाही अशी मागील काही दिवसांपासून चर्चा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पालकत्वाच्या भूमिकेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी जाऊन धडे देत असल्याचे अजित यांना मानवले नसल्याचे राष्ट्रवादीतील काही सुत्रांनी सांगितले. या सुत्रांच्या म्हणण्यानुसार त्यामुळेच राज्याच्या निर्णयप्रक्रियेतून अजित पवार बाजूला झाले आहेत.  

मात्र हेच अजित पवार पुण्यात आक्रमक झालेले दिसतात. कोरोनाच्या सुरूवातीच्या काळातही त्यांनी पुण्यात विधानभवनावर प्रशासनाच्या बैठका घेऊन त्यांना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात काय करायचे, कसे करायचे याच्या सुचना दिल्या होत्या. त्याचे पालन करण्याची तंबी दिली होती. बारामती म्हणजे स्वत:च्या मतदारसंघातच कोरोना रूग्ण सापडल्यामुळे तिथे तर त्यांनी प्रशासनाला नियमच आखून दिले होते. कोणत्याही परिस्थितीत बारामती कोरोना मुक्त झालीच पाहिजे असे आदेश देत त्यांनी जिल्हाबंदी, तालुकाबंदी, गावबंदी यासारखे निर्णयही त्वरीत घेतले होते.  

दोन दिवसांपुर्वी पुन्हा त्यांनी पुण्यात येऊन विधानभवनात प्रशासनाची बैठक घेतली. सकाळी ८ पासून त्यांनी बैठका सुरू केल्या. जिल्ह्याचा तालुकानिहाय आढावा घेत पुन्हा त्यांनी प्रशासनाला फैलावर घेतले. कामात चुकारपणा दिसला तर गय केली जाणार नाही असे बजावले. सरकारकडून हवी ती मदत मिळेल, आरोग्य विभागाने त्यांना काय हवे ते सांगावे, मात्र अंग झटकून काम करणार नाही तर ते सहन केले जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनावर पकड असलेले अजित पवार पुन्हा एकदा दिसले अशीच त्या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांची भावना आहे.  

त्याचबरोबर त्यांनी पुणे महापालिकेत सत्तेवर असलेल्या भाजपाला प्रशासनाच्या माध्यमातून खडसावले. शहरातील काही रस्त्यांच्या ९ मीटर रुंदीकरणाचा निर्णय विशिष्ट बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी घेतला जात असल्याचे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अजित पवार यांच्या निदर्शनास आणले. त्याची दखल घेत बहुमताच्या जोरावर निर्णय लादत असाल तर ते योग्य नाही. एकदोनच नव्हे तर शहरातील सगळेच रस्ते ९ मीटर रुंदीचे करा असा इशाराच त्यांनी भाजपाला दिला. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे त्यांनी पुण्यातील कोरोना स्थितीबाबत नाराजी व्यक्त केली.  

राज्याचे नेते असलेले अजित पवार तिथे शांत व पुण्यात आक्रमक असे दिसत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांच्या निकटचे कार्यकतेर्ही चक्रावले आहेत. त्यांनी राज्यासंबधीच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हावे, त्यांनीही जनतेबरोबर संवाद साधावा असे या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना सुचवले, मात्र त्यांनी त्यावर शांतपणे हसून चालले ते ठिक आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली असल्याची माहिती या कार्यकर्त्यांनी दिली. पुणे जिल्ह्यातच बांधबंदिस्ती पक्की करून नंतर राज्यात पुन्हा आवाज करायचा असा त्यांचा विचार असल्याचे या कार्यकर्त्यांचा अंदाज आहे.

Web Title: Ajit Pawar, who has been ousted from the state government, is aggressive in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.