ajit pawar speaks about 5 corporators who joined ncp and returned to shiv sena | शिवसेनेचे पाच नगरसेवक का फोडले?; अजित पवार पहिल्यांदाच बोलले

शिवसेनेचे पाच नगरसेवक का फोडले?; अजित पवार पहिल्यांदाच बोलले

मुंबई: राज्यात एकत्र सत्तेत असताना गेल्याच आठवड्यात अहमदनगरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कोरोना संकट काळात सत्तेतल्या पक्षांमध्येच फोडाफोडीचं राजकारण सुरू झाल्यानं यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. गेल्या शनिवारी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतलेल्या पाचही नगरसेवकांनी काल स्वगृही परतण्याचा निर्णय घेत हातावर पुन्हा शिवबंधन बांधलं. त्यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेटही घेतली. या सगळ्या घटनाक्रमावर अजित पवारांनी पहिल्यांदाच भाष्य केलं.

सारथी संस्थेशी संबंधित बैठकीसाठी मंत्रालयात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगरच्या पारनेरमधील फोडाफोडीवर प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी संपूर्ण घटनाक्रम पत्रकारांना सांगितला. 'शनिवारी मी बारामतीत होतो. त्यावेळी आमदार निलेश लंके मला भेटण्यासाठी आले. काही अपक्ष नगरसेवकांना पक्षात यायचं आहे, असा निरोप त्यांनी पाठवला. त्यानंतर मी त्यांना भेटलो. त्यांच्यासोबत असलेल्या नगरसेवकांच्या गळ्यात पक्षाचा गमछा घालून त्यांचं स्वागत केलं,' असं अजित पवारांनी सांगितलं.

'पक्षात आलेले नगरसेवक शिवसेनेचे असल्याचं नंतर मला समजलं. त्यानंतर मी लगेच आमदार निलेश लंके यांच्याशी बोललो. ते पाच नगरसेवक भाजपामध्ये जाणार होते. राष्ट्रवादीत प्रवेश मिळत नसेल तर आम्ही भाजपामध्ये जाऊ, अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यासाठी तुमच्याकडे आणलं, अशी माहिती लंके यांनी दिली. त्यावर सत्तेत सोबत असलेल्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींची फोडाफोड करणं योग्य नाही, असं लंके सांगितलं', अशी माहिती अजित पवारांनी दिली.

पक्षात अन्याय होत असल्याची भावना शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये होती. त्यावर तुमच्या समस्या तुमच्या पक्षप्रमुखांना सांगा. उद्धव ठाकरे त्या नक्कीच दूर करतील, असं आवाहन पाच नगरसेवकांना केलं. त्यानंतर त्यांनी माघारी परतण्याचा निर्णय घेतला आणि या सगळ्या गोष्टीवर पडदा पडला, असं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादीकडून करण्यात आलेल्या राजकारणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा होती. मात्र उद्धव ठाकरेंच्या मनात कोणतीही नाराजी नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

राष्ट्रवादीत गेलेल्या शिवसेनेच्या ५ नगरसेवकांची घरवापसी; मुख्यमंत्र्यांच्या खास माणसाची यशस्वी मध्यस्थी

शिवसेनेला राष्ट्रवादीचा 'दे धक्का'; निवडणुकीच्या तोंडावरच पारनेरमध्ये पाच नगरसेवक फोडले!

"रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरणारे आज दिवसा उजेडी राष्ट्रवादीकडे भीक मागताहेत"

'मातोश्री'तून थेट 'बारामती'ला फोन; "आमचे नगरसेवक परत पाठवा!"

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ajit pawar speaks about 5 corporators who joined ncp and returned to shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.