अजित पवारांच्या अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी झालेली? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 07:32 IST2026-03-05T07:30:19+5:302026-03-05T07:32:03+5:30
Ajit Pawar Plane Crash: अजित पवार विमान अपघात प्राथमिक अहवालात जाणीवपूर्वक चुका केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. व्हीएसआर कंपनीला कोणाचा वरदहस्त? बारामती विमानतळावर रेकी झाली होती का? सविस्तर वाचा.

अजित पवारांच्या अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी झालेली? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला महिना उलटल्यानंतर समोर आलेल्या प्राथमिक अहवालावरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या अहवालातील त्रुटींवरून थेट नागरी विमान वाहतूक महासंचालनालयावर निशाणा साधला आहे. या अहवालात जाणीवपूर्वक मूलभूत चुका करण्यात आल्याचा दावा करत, डीजीसीए नेमके कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे? असा जळजळीत सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा आत्मविश्वास कुणामुळे?
रोहित पवार यांनी संबंधित विमान कंपनीच्या (व्हीएसआर) मालकावरही गंभीर आरोप केले आहेत. "आमचे कोणी काही बिघडवू शकत नाही, सरकार आमची विमाने वापरत आहे," असा दावा कंपनीचे मालक करत असल्याचे पवारांनी सांगितले. कंपनीला हा आत्मविश्वास नेमका कोठून मिळतो आणि त्यांच्यावर कुणाचा वरदहस्त आहे, अशी विचारणा त्यांनी केली. अहवालातील चुका या अपघाताचे गांभीर्य कमी करण्यासाठीच केल्या गेल्या असल्याची दाट शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी?
या प्रकरणात एक नवीन आणि खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केला आहे. अपघातापूर्वी बारामती विमानतळ परिसरात काही संशयास्पद व्यक्तींनी रेकी केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे असून, सीआयडी (CID) आणि सीआयबीने (CIB) यात तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या रेकीचा आणि अपघाताचा काही संबंध आहे का, हे शोधणे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.