एफआयआर का दाखल होत नाही, सुनेत्रा पवारांनीच मुख्यमंत्र्यांना जाब विचारावा; संजय राऊत यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 11:05 IST2026-02-26T11:03:47+5:302026-02-26T11:05:42+5:30
Ajit Pawar Plane Crash FIR Row : अजित पवार विमान अपघातावरून संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. VSR कंपनीशी काही मंत्र्यांचे संबंध असल्याचा आरोप करत, DGCA कडून पुरावे नष्ट केले जात असल्याचा दावा त्यांनी केला.

एफआयआर का दाखल होत नाही, सुनेत्रा पवारांनीच मुख्यमंत्र्यांना जाब विचारावा; संजय राऊत यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताचे प्रकरण आता राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. "हा केवळ अपघात नसून घातपाताचा संशय आहे," असा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केला आहे. रोहित पवार यांनी केलेल्या अभ्यासाचे कौतुक करतानाच, राऊत यांनी या प्रकरणात सत्ताधारी पक्षातील काही मंत्र्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा गंभीर आरोप केला.
संजय राऊत यांनी नागरी विमान वाहतूक संचालनालयावर तोफ डागली आहे. "DGCA हे देशातील अत्यंत भ्रष्ट खाते असून अनेक राजकारण्यांचे त्यांना आशीर्वाद आहेत. विमानाचा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असतानाही तो खराब झाल्याचे खोटे सांगितले जात आहे," असा दावा त्यांनी केला. तसेच 'VSR' कंपनी आणि 'DGCA' या दोन्ही संस्थांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारावा
राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीच्या मृत्यूबाबत एफआयआर का दाखल होत नाही? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. "सुनेत्रा पवार यांना आमदारांनी उपमुख्यमंत्री केले असले तरी, त्यांनी पत्नी म्हणून मुख्यमंत्र्यांना विचारले पाहिजे की गुन्हा दाखल का होत नाही? कोणाचा फोन आल्यावर डीसीपींचे वर्तन बदलले आणि हे प्रकरण दाबलं गेले?" असे आरोप राऊत यांनी केले.
अजित पवारांची भाजपने फसवणूक केली?
राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, "अजित पवारांना भाजपमधून बाहेर पडायचे होते, पण भाजपने त्यांची फसवणूक केली. आता एकत्र येण्याची प्रक्रिया संपली आहे." तसेच, मुंबई महानगरपालिकेच्या ३६ हजार कोटींच्या मुदत ठेवीमोडीत काढण्यावरून त्यांनी सरकारवर 'मुंबईची लूट' केल्याचा आरोप केला.