"...तर त्यावर बोलण्याचा त्यांना अधिकार काय?"; शरद पवारांचा CM देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 10:04 IST2026-02-04T10:01:25+5:302026-02-04T10:04:44+5:30
जोपर्यंत माझ्यापर्यंत कुठलीही अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत मी अपघाताबाबत उगीच शंका घेणार नाही असं शरद पवारांनी सांगितले.

"...तर त्यावर बोलण्याचा त्यांना अधिकार काय?"; शरद पवारांचा CM देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
बारामती - राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून होणाऱ्या चर्चेवर मुख्यमंत्री फडणवीसांनी जर अशी काही चर्चा सुरू असती तर अजित पवारांनी भाजपाशी चर्चा केली असती असं विधान केले होते. आज बारामतीत झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांच्या या विधानावर शरद पवारांनी पलटवार केला. विलीनीकरणाच्या चर्चेत ते कुठेही नव्हते असा उल्लेख करत त्यांना बोलण्याचा काय अधिकार असाही प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला.
शरद पवारांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, राष्ट्रवादी विलीनीकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बोलण्याचा काय अधिकार आहे हे मला समजले नाही. या सगळ्या चर्चेत ते कुठेच नव्हते. त्यामुळे त्यावर भाष्य करण्याचा त्यांना काय अधिकार आहे मला माहिती नाही. आमचे सहकारी जयंत पाटील आणि अजित पवार हे विलीनीकरणावर चर्चा करत होते. सध्या विलीनीकरणावर राजकीय चर्चा नाही असंही त्यांनी स्पष्ट केले.
तर सुनेत्रा पवारांचा शपथविधी झाला, त्यांना संधी दिली हा आनंद आहे. शपथविधीबाबत मला भाष्य करायचे नाही. अजितदादांच्या स्मारकाबाबत मला माहिती नाही. मी ते पेपरमध्ये वाचले. परंतु मला काही कल्पना नाही. ज्या संस्थेच्या जागेची चर्चा लोकांनी केली आहे. त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे. त्यामुळे मला ठाऊक असले पाहिजे. अद्याप त्याबाबत आम्ही चर्चाही केली नाही. आम्ही संस्थेचे सर्व एकत्रित बसून त्यावर चर्चा करू. त्यामुळे आज अजित पवारांच्या स्मारकावर भाष्य करणे योग्य नाही असं शरद पवारांनी सांगितले.
दरम्यान, अजित पवारांच्या अपघाती निधनाबाबत सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी केली होती. त्याशिवाय संजय राऊत आणि इतर काही नेत्यांनी अजित पवारांच्या अपघातावर शंका उपस्थित केली. त्यावरही शरद पवारांनी खुलासा केला. अजित पवारांच्या अपघाती निधनाबाबत फार सुरुवातीला मी बोललोय. जोपर्यंत माझ्यापर्यंत कुठलीही अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत मी अपघाताबाबत उगीच शंका घेणार नाही असं शरद पवारांनी सांगितले.