भावनिकदृष्ट्या दोन्ही राष्ट्रवादी आल्या जवळ, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाकडे लाखोंचे लक्ष
By यदू जोशी | Updated: January 29, 2026 06:10 IST2026-01-29T06:10:07+5:302026-01-29T06:10:43+5:30
Ajit Pawar Death News: राष्ट्रवादीच्या दोन गटांचे विलीनीकरण होणार, अशी चर्चा गेले होत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आता एकूणच राष्ट्रवादीच्या पुढील प्रवासाबाबत दोन्ही गट काय निर्णय घेतात याविषयीची स्पष्टता लवकरच येईल. मात्र, अजितदादांच्या जाण्याने दोन्ही गटांना भावनिकदृष्ट्या अधिकच जवळ आणले आहे.

भावनिकदृष्ट्या दोन्ही राष्ट्रवादी आल्या जवळ, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाकडे लाखोंचे लक्ष
- यदु जोशी
मुंबई - राष्ट्रवादीच्या दोन गटांचे विलीनीकरण होणार, अशी चर्चा गेले होत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आता एकूणच राष्ट्रवादीच्या पुढील प्रवासाबाबत दोन्ही गट काय निर्णय घेतात याविषयीची स्पष्टता लवकरच येईल. मात्र, अजितदादांच्या जाण्याने दोन्ही गटांना भावनिकदृष्ट्या अधिकच जवळ आणले आहे.
जेव्हा कुटुंबातील एक मोठी व्यक्ती जाते तेव्हा कुटुंबातील आधीची असलेली थोडीबहुत किल्मिषे असतील तर ती गळून पडतात. राष्ट्रवादीचे दोन गट आणि पवार कुटुंबात कटुता संपली असल्याचे चित्र आधीच निर्माण झालेले होते आणि पूर्वीसारखा आपला पक्ष एकसंध होणार, असे लाखो कार्यकर्ते, नेते यांना मनोमन वाटू लागले होते. या एकसंध राष्ट्रवादीचे नेतृत्व अजित पवार करतील आणि तुतारी इतिहासजमा होऊन घड्याळ हेच सर्वांचे निवडणूक चिन्ह असेल, असे आशादायी चित्रही निर्माण झालेले होते. आधी आघाडी करून दोन गट आपापल्या चिन्हावर नगर परिषद निवडणूक लढले अन् जिल्हा परिषदेला तर दोघांनी घड्याळच घेतले. त्यामुळे आता पुढचा व अंतिम टप्पा दोघांनी एक होण्याचा असेल या दिशेने सगळे काही सुरू असतानाच अजित पवार यांचे अचानक जाणे आणि त्यातून उद्भवलेली परिस्थिती याचा विचार करता पुढील काळात एकच राष्ट्रवादी असेल, हे आता जवळपास नक्की मानले जात आहे.
राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना शरद पवार नावाच्या वटवृक्षासमोर वयाच्या ८५ व्या वर्षी पुन्हा एक आव्हान येऊन ठाकले आहे. २०२३ मध्ये आपल्यापासून दूर जात वेगळी चूल मांडणारे पुतणे अजितदादा आता कायमचे दूर निघून गेले आहेत आणि विस्कटलेली सगळी घडी नीट बसविण्याची जबाबदारी या जाणत्या नेत्याच्या थरथरत्या हातांवर आली आहे. आपला पक्ष आणि पुतण्याचा पक्ष याचे एकच घर नव्याने बांधण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. त्यांच्यासोबतच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे हे पुढील वाटचालीसंदर्भात कोणता निर्णय घेतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच भाजपसोबत जायचे किंवा नाही याबाबत शरद पवार काय निर्णय घेतात तेही महत्त्वाचे असेल. भाजपचे दिल्ली आणि मुंबईतील नेतृत्व राष्ट्रवादीतील घडामोडींकडे अर्थातच लक्ष ठेवून असेल यात शंकाच नाही.
नवीन उपमुख्यमंत्री कोण?
अजितदादांच्या जागी नवीन उपमुख्यमंत्री कोण असतील? त्यांच्या पत्नी खा. सुनेत्रा पवार यांना दिल्लीहून बोलावून उपमुख्यमंत्री केले जाईल का? की अजित पवार यांच्या पक्षातील एखाद्या ज्येष्ठ नेत्याला ती संधी मिळेल? की दोन राष्ट्रवादी लगेच एकत्रित आल्या तर वेगळेच नाव समोर येईल? असे तर्कवितर्क काही दिवस नक्कीच लढविले जातील.