मावशीचं घर आणि बालपणीचं बागडणं... फुलंब्रीशी जोडलेली एक हळवी नाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 06:05 IST2026-01-29T06:05:12+5:302026-01-29T06:05:55+5:30
Ajit Pawar Death News: राजकारणात ज्यांची ओळख कठोर निर्णय, ठाम भूमिका आणि कणखर नेतृत्व अशी होती, तेच उपमुख्यमंत्री अजित पवार फुलंब्रीत आले की मात्र वेगळेच दिसायचे. इथे ना पदाचा भार, ना सत्तेचा रुबाब- फक्त असायचं मावशीचं घर, ओळखीची माती, बालपणीच्या आठवणी आणि नात्यांची ऊब.

मावशीचं घर आणि बालपणीचं बागडणं... फुलंब्रीशी जोडलेली एक हळवी नाळ
फुलंब्री (जि. छत्रपती संभाजीनगर) : राजकारणात ज्यांची ओळख कठोर निर्णय, ठाम भूमिका आणि कणखर नेतृत्व अशी होती, तेच उपमुख्यमंत्री अजित पवार फुलंब्रीत आले की मात्र वेगळेच दिसायचे. इथे ना पदाचा भार, ना सत्तेचा रुबाब- फक्त असायचं मावशीचं घर, ओळखीची माती, बालपणीच्या आठवणी आणि नात्यांची ऊब.
फुलंब्री हे केवळ एक गाव नव्हतं, तर दादांच्या आठवणींचं, ऋणानुबंधांचं आणि बालपणाच्या खेळण्या-बागडण्याचं घर होतं. मावशी सुषमा बाळासाहेब देशमुख यांचं घर म्हणजे दादांसाठी भावनिक जिव्हाळा होता. उन्हाळ्याच्या सुट्ट्या, दिवाळीची धामधूम, मावस भावांसोबतच खेळणं अन् अंगणातल्या गप्पा.. या सगळ्यातूनच एक नेता घडत होता; पण, त्याआधी एक संवेदनशील माणूस जगत होता. ‘दादा कितीही मोठे झाले तरी इथे आले की ते आमचे मावसभाऊ असायचे, छत्रपती संभाजीनगरला आले की मावशीची भेट न घेता कधीही परत जात नव्हते, असे सांगताना मावसभाऊ नितीन देशमुख यांना अश्रू अनावर झाले.
कोरोनाच्या काळातही दादांनी वेळ काढून मावशीची भेट घेत चांगल्या दोन तास गप्पा केल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांतच मावशीचे निधन झाले.
राजकारणात येऊन बनले विकासाचा आधारस्तंभ
- फुलंब्रीसाठी अजित पवार केवळ नातेवाईक नव्हते, तर विकासाचा आधारस्तंभ होते.
- पाथ्री, निधोना परिसरातील ३३ केव्ही विद्युत केंद्राचा प्रश्न असो की वर्षानुवर्षे बंद पडलेला देवगिरी सहकारी साखर कारखाना अवसायनातून बाहेर काढण्यासाठी केलेले प्रयत्न, दादांनी फुलंब्रीकडे कधीही पाठ फिरवली नाही.
- आज कारखाना कर्जमुक्त होऊन नव्या गाळपाच्या उंबरठ्यावर उभा आहे, तेव्हा शेतकऱ्यांच्या मनात अजितदादांबद्दल कृतज्ञतेचा सूर उमटतो.