Ajit Pawar Death in Plane Crash: राष्ट्रवादी काँग्रेस(अप) पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज(दि.28) सकाळी बारामती येथे विमानअपघातात दुःखद निधन झाले. बारामतीविमानतळावर लँडिंगदरम्यान हा भीषण अपघात झाला. यात अजितदादांसह, विमानातील सर्व पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर संबंधित विमान कंपनीच्या मालकाची महत्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमान व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड (VSR Aviation) या कंपनीचे होते. अपघातानंतर दिल्लीमध्ये मीडियाशी संवाद साधताना कंपनीचे संचालक विजय कुमार सिंह यांनी सांगितले की, 'विमान उतरवण्याचा निर्णय पूर्णतः वैमानिकाचा होता. त्यांनी आधी रनवे 29 वर विमान उतरवण्याचा प्रयत्न केला, मात्र काही तांत्रिक अडचण आली. त्यानंतर रनवे 11 वर पुन्हा लँडिंगचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी हा दुर्दैवी अपघात घडला.'
विमान पूर्णपणे व्यवस्थित; कोणताही तांत्रिक दोष नव्हता
विजय कुमार सिंह स्पष्टपणे म्हणाले, 'विमानाची देखभाल अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यात आली होती. आमच्या माहितीनुसार विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता. कोणतीही यांत्रिक अडचण आढळलेली नाही.
दृश्यता कमी, रनवे न दिसणे हे प्राथमिक कारण?
ते पुढे म्हणाले, 'प्राथमिकदृष्ट्या असे दिसते की, वैमानिकाला रनवे स्पष्टपणे दिसत नव्हता. दृश्यता कमी होती. आम्ही सध्या मृतांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न करत आहोत. ही आमच्यासाठी खूप मोठी शोकांतिका आहे.' 2023 मध्ये झालेल्या अपघाताबाबत बोलताना ते म्हणाले, 'तो अपघात मुंबई विमानतळावर झाला होता. त्यावेळीही पाऊस होता आणि दृश्यता कमी होती. लँडिंगनंतर विमान रनवेवरून घसरले होते. ती वेगळी घटना होती.'
वैमानिक अत्यंत अनुभवी होते
विमानाच्या क्रूबाबत माहिती देताना विजय कुमार सिंह म्हणाले, 'कॅप्टन सुमित कपूर यांना 16 हजारांहून अधिक तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. को-पायलटकडेही सुमारे 1500 तासांचा अनुभव होता. कॅप्टन कपूर यांनी यापूर्वी सहारा एअरलाइन, जेटलाईट आणि जेट एअरवेज सारख्या नामांकित विमान कंपन्यांमध्ये काम केले होते. ते या प्रकारच्या विमानावरही अत्यंत अनुभवी होते.'
ते माझ्या कुटुंबासारखे होते
'कॅप्टन सुमित कपूर माझे खूप चांगले मित्र होते; ते मला भावासारखे होते. त्यांचा मुलगाही आमच्याच कंपनीत पायलट आहे. कॅप्टन शांभवी पाठक माझ्यासाठी मुलीसारख्या होत्या. दोघेही उत्कृष्ट वैमानिक आणि अत्यंत चांगले माणसे होती,' अशी प्रतिक्रिया विजय कुमार सिंह यांनी दिली. दरम्यान, या अपघाताबाबत नागरी विमान वाहतूक यंत्रणांकडून चौकशी सुरू असून, ब्लॅक बॉक्स व तांत्रिक तपासणीनंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
Web Summary : Following Ajit Pawar's reported death in a plane crash, the owner of VSR Aviation stated the pilot decided to land. He claimed no technical fault existed, suggesting visibility issues as a possible factor. The pilot was experienced.
Web Summary : अजित पवार की विमान दुर्घटना में कथित मौत के बाद, वीएसआर एविएशन के मालिक ने कहा कि पायलट ने उतरने का फैसला किया। उन्होंने दावा किया कि कोई तकनीकी खराबी नहीं थी, दृश्यता मुद्दों को एक संभावित कारक बताया। पायलट अनुभवी था।