मुंबई - राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत राज्यात दावे प्रतिदावे सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चांना अंतिम टप्प्यात होत्या. १२ फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घोषणाही होणार होती असा दावा शरद पवार गटाचे नेते करत आहेत. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशाप्रकारे कुठलीही चर्चा झाली नाही. अजित पवार माझ्याशी सगळ्या गोष्टी शेअर करत होते. मृत्यूच्या आदल्या दिवशी आम्ही १ तास गप्पा मारत होतो. राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा झाली असेल तर त्याआधी अजित पवारांनी भाजपाशी चर्चा केली असती असं मुख्यमंत्री फडणवीस म्हटले. त्यावरून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिदावा केला आहे.
शशिकांत शिंदे म्हणाले की, खरेतर अजित पवारांच्या जाण्यानंतर जी राजकीय चर्चा होतेय हीच दुर्दैवाची आहे. आम्हाला त्याबाबत अजिबात अपेक्षा नाही. आम्ही प्रामाणिकपणे सांगतो, माझे आणि अजित पवारांचे भावनिक नाते होते. मी अजितदादांची शपथ घेऊन सांगतो, विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती. आता अजित पवारांनी कुणाला सांगितले की नाही हे आम्हाला माहिती नाही. जेव्हा आम्ही अजितदादांना विचारायचो, तुम्ही प्रांताध्यक्ष आणि तुमच्या लोकांशी बोलला का तेव्हा ते होय, मी बोललोय, तुम्ही फार काळजी करू नका. मी निर्णय घेणार आहे. आपण निर्णय घ्यायचा असं अजितदादांनी सांगितले होते असं शिंदेंनी म्हटलं.
त्याशिवाय तुमच्या मित्रपक्षांशी चर्चा झालीय का असं विचारले त्यावरही दादांनी मी वरिष्ठांशी बोललोय असं म्हटलं. आता अजितदादांना विचारण्याचं धाडस आम्ही करू शकत नाही. तुम्ही कोणाशी बोललाय, त्यांची नावे सांगा वैगेरे...आता कोण याला नकार देतेय त्याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही. आम्हाला याचे भावनिक राजकारण करायचे नाही. आम्हाला राजकीय स्वार्थ साधायचा नाही. विलीनीकरणाबाबत माध्यमांनी विचारल्यानंतर आम्ही १२ तारखेचा मुद्दा मांडला होता. करायचे की नाही हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. आम्ही फक्त अजितदादांनी अंतिम इच्छा म्हणून ती भावना व्यक्त केली. त्यात आम्हाला कुठला राजकीय स्वार्थ साधायचा होता, शरद पवारांची भूमिका स्पष्ट होती. तरीसुद्धा आम्हाला वाटले आम्ही भूमिका मांडली असंही शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, आम्ही आता हा विषय इथेच मर्यादित ठेवतोय. आता या विषयावर आम्हाला चर्चा करण्याची गरज नाही. याचे राजकीय विश्लेषण करण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर दुर्दैवाचे आहे. अजितदादा किती भावनिक होते हे सगळ्यांना माहिती आहे. शरद पवारांच्या देखत मला पक्ष एकत्र आणायचा आहे असं ते म्हणायचे. त्याहून एक प्रश्न आम्हाला विचारायचा आहे. आम्ही सगळीकडे घड्याळ चिन्हावर उमेदवार उभे केले ना...ते का केले? आम्ही वेगळे करू शकत नव्हतो का..सगळे ठरलेले म्हणूनच केले. अजितदादा गेल्याचा कुठलाही राजकीय फायदा आम्हाला घ्यायचा नाही. शरद पवार हे याही वयात बारामतीत दुसऱ्या दिवशी फिरले. ते लढणारा योद्धा आहे. आम्ही शस्त्र खाली ठेवून सरेंडर व्हायला गेलो नाही. मन जुळवण्याचा प्रयत्न झाला. कुटुंब विभागले गेले ते एकत्र आणले. मतविभागणी झाली तर त्याचा तोटा काय होतो हे नगरपालिका, नगरपंचायतीत पाहिले. सुनील तटकरेंनाही हे माहिती आहे. परंतु ते आता वेगळे बोलतायेत. जे काही असेल तुमची भूमिका स्पष्ट करा आणि हा विषय संपवा असंही शशिकांत शिंदे यांनी तटकरेंना आव्हान केले.