...म्हणूनच अजितदादांना बारामतीचा विमानतळ लँडिंगसाठी सेफ करायचा होता...; ऑक्टोबरमध्येच घेतलेली बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 18:10 IST2026-01-28T18:07:53+5:302026-01-28T18:10:14+5:30
बारामती (पुणे): उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने केवळ एक कणखर प्रशासकच नाही, तर राज्याच्या विमानचालन क्षेत्राचा कायापालट करू ...

...म्हणूनच अजितदादांना बारामतीचा विमानतळ लँडिंगसाठी सेफ करायचा होता...; ऑक्टोबरमध्येच घेतलेली बैठक
बारामती (पुणे): उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने केवळ एक कणखर प्रशासकच नाही, तर राज्याच्या विमानचालन क्षेत्राचा कायापालट करू इच्छिणारा एक द्रष्टा नेता गमावला आहे. अत्यंत विदारक बाब म्हणजे, ज्या बारामती विमानतळावर सुरक्षित लँडिंगसाठी आधुनिक यंत्रणा बसवण्याचे निर्देश त्यांनी अवघ्या काही महिन्यांपूर्वी दिले होते, त्याच धावपट्टीवर काळाने त्यांच्यावर झडप घातली.
अजितदादा, असे अचानक निघून जाणे बरोबर नाही..!
आजपासून बरोबर चार महिन्यांपूर्वी, ऑक्टोबर २०२५ मध्ये अजित पवार यांनी मंत्रालयात एक विशेष बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी बारामती विमानतळासह राज्यातील इतर छोट्या विमानतळांच्या विकासाचा आराखडा तयार केला होता. विशेषतः रात्रीच्या वेळी सुरक्षित लँडिंग, रडार यंत्रणा आणि धावपट्टीवरील दिवे या तांत्रिक सोयी तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी 'महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी'ला दिले होते.
अजित पवारांचे 'व्हिजन' काय होते?
मुंबई-दिल्लीसारख्या मोठ्या विमानतळांवरील ताण कमी करण्यासाठी बारामती, शिर्डी, यवतमाळ, धाराशिव आणि लातूर यांसारख्या छोट्या विमानतळांवर पार्किंग हब विकसित करण्याचे त्यांचे नियोजन होते. "छोट्या शहरांतूनही विमाने सुरक्षितपणे उडू शकली पाहिजेत," यासाठी त्यांनी रडार आणि आधुनिक सुरक्षा उपाययोजनांचे जाळे विणण्यास सुरुवात केली होती. राज्यातील विमानचालन क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी एक विशेष 'फ्रेमवर्क' तयार केले होते, जेणेकरून पर्यटन आणि उद्योगाला मोठी गती मिळेल.
नशिबाचा खेळ
अजित पवारांना बारामती विमानतळ हे जागतिक दर्जाच्या सुविधांनी सज्ज करायचे होते. "यामुळे ग्रामीण भागातील कृषी निर्यात आणि गुंतवणूक वाढेल," असा विश्वास त्यांनी त्या बैठकीत व्यक्त केला होता. मात्र, ज्या 'सेफ लँडिंग'साठी ते आग्रही होते, तीच व्यवस्था पूर्णत्वास येण्यापूर्वीच बारामतीमध्ये त्यांचा दुर्दैवी अपघात झाला. दादांनी पाहिलेले 'उड्डाण महाराष्ट्राचे' हे स्वप्न आता अधुरे राहिले असून, त्यांच्या या निधनाने राज्याचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे.