Ajit Pawar: ६ वेळा उपमुख्यमंत्री, ६ महिने ६ दिवसांपूर्वीच साजरा केला ६६ वा वाढदिवस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 14:38 IST2026-01-29T14:36:31+5:302026-01-29T14:38:00+5:30
Ajit Pawar 6 number Connection: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात नेते अजित पवार आपल्याला सोडून गेले, पण त्यांच्या आयुष्यातील ६ या आकड्याशी कनेक्शन पाहून सध्या सर्वजण थक्क झाले आहेत.

Ajit Pawar: ६ वेळा उपमुख्यमंत्री, ६ महिने ६ दिवसांपूर्वीच साजरा केला ६६ वा वाढदिवस!
महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या धाडसी निर्णयांसाठी ओळखले जाणाऱ्या अजित पवारांचे बुधवारी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आता त्यांचे ६ क्रमांकाशी असलेल्या अजब कनेक्शनची सोशल मीडियावर चांगलीच राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. हा निव्वळ योगायोग असला, तरी त्यांच्या कारकिर्दीचे अनेक पैलू या आकड्याशी जोडले गेले आहेत.
अजित पवारांच्या आयुष्यातील शेवटच्या काळातील आकडेवारी पाहिली तर एक अजब कनेक्शन दिसून आले. निधनाच्या वेळी अजित पवारांचे वय ६६ वर्षे होते. विशेष म्हणजे, ज्या दिवशी हा अपघात झाला, त्याच्या बरोबर सहा महिने आणि सहा दिवस आधीच त्यांनी आपला ६६ वा वाढदिवस साजरा केला होता. शिवाय, महाराष्ट्राच्या इतिहासात तब्बल ६ वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला होता. अजित पवारांनी २०१० ते २०२४ या काळात सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
अजित पवार हे पृथ्वीराज चव्हाण सरकारमध्ये १० नोव्हेंबर २०१० रोजी पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले. सुमारे २२ महिन्यांनंतर त्यांना पायउतार व्हावे लागले, परंतु राजकारणात त्यांचे पुनरागमन जलद झाले. २५ ऑक्टोबर २०१२ रोजी ते पुन्हा त्याच पदावर परतले. २०१९ मध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात नाट्यमय अध्यायांपैकी एक मानल्या जाणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी फक्त ८० तास उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. नंतर, ते उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २ जुलै २०२३ रोजी, एकनाथ शिंदे सरकारच्या काळात ते एनडीएमध्ये सामील झाले तेव्हा ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. ५ डिसेंबर २०२४ पासून, त्यांनी फडणवीस सरकारमध्ये पुन्हा तेच पद भूषवले. यामुळे एकूण सहा उपमुख्यमंत्री झाले.