शिंदेंनंतर भाजपचाही ठाकरे, काँग्रेसला धक्का! ९ माजी नगरसेवक करणार पक्षप्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 19:09 IST2025-02-12T19:09:00+5:302025-02-12T19:09:56+5:30
Uddhav Thackeray Shiv Sena: विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करता न आलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागण्याची चिन्हे आहेत.

शिंदेंनंतर भाजपचाही ठाकरे, काँग्रेसला धक्का! ९ माजी नगरसेवक करणार पक्षप्रवेश
Uddhav Thackeray BJP Maharashtra News: ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेते एकनाथ शिंदेंच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहेत. राजन साळवी यांनी राजीनामा दिला असून, ते शिंदेंसोबत जाणार आहेत. शिंदेंपाठोपाठ आता भाजपनेही ठाकरे आणि काँग्रेसला धक्का दिला आहे. ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचे कुडाळमधील ९ माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. महाराष्ट्र भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळमधील शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सात, तर काँग्रेसचे दोन असे एकूण ९ माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर बदलली समीकरणे
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सत्ताधारी भाजपला चांगले यश मिळाले नव्हते. विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होण्याचे अंदाज व्यक्त केले जात होते. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील अनेकजण थांबले होते.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मानहानिकारक पराभव झाला. त्यानंतर आता हळूहळू नेते पक्षाची साथ सोडताना दिसत आहे. कुडाळमध्ये २०१९ मध्ये वैभव नाईक जिंकून आले होते. २०२४ मध्ये मात्र, नीलेश राणे यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे कुडाळमधील समीकरणे बदलली असून, भाजपची ताकद वाढली आहे.
लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची कामगिरी चांगली राहिली नाही. अनेक विद्यमान आमदार पराभूत झाले. त्यामुळे धुसफूस वाढली असून, राजन साळवी यांनी त्यातूनच राजीनामा देत शिंदेंच्या सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.