सतरा तासांनंतर मोहीम फत्ते--उमाशंकर यांची व्यूहरचना यशस्वी

By admin | Published: February 10, 2015 11:34 PM2015-02-10T23:34:37+5:302015-02-11T00:01:00+5:30

नानेलीच्या जंगलात एक हत्ती जेरबंद,, कर्नाटकच्या पथकासह वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रयत्न,पहिल्याच दिवशी पथकाच्या मोहिमेला यश

After seventeen hours campaign campaign - Uma Shankar's strategy is successful | सतरा तासांनंतर मोहीम फत्ते--उमाशंकर यांची व्यूहरचना यशस्वी

सतरा तासांनंतर मोहीम फत्ते--उमाशंकर यांची व्यूहरचना यशस्वी

Next

महेश सरनाईक/ विजय पालकर- माणगाव
माणगाव खोऱ्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत हैदोस माजविलेल्या रानटी हत्तींना पकडण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने वनविभागाने सोमवार (दि. ९)पासून हत्ती पकड मोहीम राबविण्यास सुरुवात
केली.कर्नाटकहून आलेल्या पथकातील चार प्र्रशिक्षित हत्तींना घेऊन सोमवारी वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सकाळी १0 वाजता नानेली येथील गणपती मंदिरानजीकच्या डोंगरात प्रत्यक्ष मोहिमेवर गेले होते.
या मोहिमेत सामील झालेल्या चार प्रशिक्षित हत्तींसह माहूत व प्रशिक्षण देणारे डॉक्टर यांच्या पथकाची चार वेगवेगळ्या टीम करून नानेली येथील जंगलात असलेल्या दोन हत्तींना पकडण्यासाठी व्यूहरचना सुरू झाली. दुपारपर्यंत जंगलात असलेले दोन रानटी हत्ती या पथकाला चकवा देत होते. शोधकार्यात अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत सायंकाळी पाच वाजल्यानंतर या पथकातील प्रमुख डॉक्टर उमाशंकर यांनी एका हत्तीवर इंजेक्शनचा डॉट केल्याची बातमी पुढे आली.
मात्र, वनविभागासह या पथकाने याबाबत कमालीची गुप्तता पाळली होती. सायंकाळी सहानंतर हत्ती पकड मोहीम थांबविण्यात येईल, असा कयास वर्तविण्यात येत होता.

मोबाईलने वाचविले
दरम्यान, सायंकाळची वेळ होती. अंधार पडू लागला होता. त्यातच या रानटी हत्तीवर डॉट केल्यामुळे त्याला पकडण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्यामुळे डॉ. उमाशंकर यांच्यासमोर मोठे आव्हान होते. ते आव्हान लीलया पार करण्यासाठी त्यावेळी डॉक्टरांच्या समवेत असलेल्या टीमने ज्या हत्तीवर डॉट केला आहे, त्या हत्तीचा पाठलाग सोडला नाही. दरम्यान, रात्र झाल्याने काळोख पडला होता. तसेच काहीकाळ त्यांचा संपर्कही होत नव्हता. त्यामुळे सर्वांच्या काळजाचा काही काळ ठोका चुकला होता. मात्र, दैव बलवत्तर म्हणून डॉ. उमाशंकर यांनी आपल्याकडे असलेल्या मोबाईलच्या बॅटरीद्वारे या परिस्थितीवर मात करण्यात यश मिळविले. रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान रानटी हत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी डॉ. उमाशंकर, व्यंकटेश व चमूने पुन्हा प्रयत्न सुरू केले. यातच या हत्ती मोहिमेत लीड करणारा प्रशिक्षित हत्ती अभिमन्यूच्या साहाय्याने रानटी हत्तीला पकडण्यासाठी व्यूहरचना सुरू झाली. मात्र, तो हत्ती एवढा मस्तवाल होता की, या मोहिमेचे नेतृत्व करणारा अभिमन्यू या प्रशिक्षित हत्तीवर त्याने हल्ला चढविला. यावेळी सुमारे पाच ते दहा मिनिटांपर्यंत नानेलीच्या जंगलात या दोन्ही हत्तींमध्ये हे युद्ध सुरू होते. हीच संधी योग्य असे मानून डॉ. उमाशंकर यांचे सहायक व्यंकटेश यांनी रानटी हत्तीवर डॉट मारला.

उमाशंकर यांना आत्मविश्वास
या मोहिमेतील प्रमुख डॉक्टर उमाशंकर यांना या रानटी हत्तींना पकडण्याबाबत प्रचंड आत्मविश्वास होता. त्यामुळे दोनपैकी एका हत्तीला जेरबंद केल्याशिवाय जंगलातून न परतण्याचा जणू चंगच बांधला होता. त्याप्रमाणे सायंकाळी मोहीम संपली म्हणून आंबेरी येथील तळावर परतलेल्या वनविभागाच्या पथकातील वन अधिकारी, कर्मचाऱ्यांना आंबेरी येथून मागे पुन्हा जंगलात बोलावण्यात आले. सायंकाळी पाचच्या दरम्यान डॉ. उमाशंकर यांच्या पथकातील व्यंकटेशने या दोन रानटी हत्तींपैकी एका हत्तीवर इंजेक्शनचा डॉट चढविला. मात्र, डॉट चढविल्यानंतर हे दोन्ही हत्ती जंगलात दोन दिशेला सैरावैरा पळू लागले. त्यात एक हत्ती या पथकाच्या तावडीतून निसटला.

रानटी हत्तीला नमविले
दरम्यान, डॉ. उमाशंकर यांच्या युक्तीप्रमाणे या युद्धमोहिमेतील अभिमन्यूच्या साथीला अर्जुन, हर्ष आणि गजेंद्र या अन्य तीन प्रशिक्षित हत्तींच्या साहाय्याने या रानटी हत्तीला घेरून त्याच्यावर नियंत्रण मिळविण्यात यश आले. ही घटना रात्री दहा वाजेपर्यंत नानेलीच्या जंगलात सुरू होती. मात्र, याबाबत वनविभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांना अथवा इतर कर्मचाऱ्यांना कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती.


तीन किलोमीटर अंतर, चार तासांचा कालावधी
दरम्यान, नानेलीच्या जंगलातून आंबेरी येथील प्रशिक्षण केंद्रावर या रानटी हत्तीला आणण्यासाठी प्रत्यक्षात सुमारे तीन किलोमीटरचे अंतर असूनही सुमारे चार तासांचा कालावधी गेला. साडेदहा वाजता हत्तींना जंगलातून बाहेर काढण्यास सुरुवात केली आणि आंबेरी येथे रात्री अडीच वाजता हत्तींना आणण्यात आले.

पथदीप केले बंद
रानटी हत्तीवर सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान डॉट केल्याने सहा ते सात तासांचा अवधी गेला होता. त्यामुळे रात्री त्याला आंबेरी येथे क्रॉलवर नेईपर्यंत वनविभाग आणि पथकाची मोठी जबाबदारी होती. त्यामुळे आंबेरीकडे जाणाऱ्या मार्गावरील पथदीपही बंद करण्यात आले होते. तसेच परिसरातील घरामधील लाईटही बंद करण्यात आल्या होत्या.


ग्रामस्थ हत्तींना पाहण्यासाठी ठाण मांडून
या रानटी हत्तीला पकडून आंबेरी येथे आणण्याची मोहीम प्रत्यक्षात रात्री १0 वाजल्यानंतर सुरू होऊनही या भागातील काही हौशी ग्रामस्थ हत्तीला पाहण्यासाठी रात्री दीड ते अडीच वाजेपर्यंत थांबले होते.

सहायक वनरक्षक, वनक्षेत्रपाल ठाण मांडून
या मोहिमेच्या यशस्वीतेचे श्रेय सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना द्यावे लागेल. त्याचबरोबर वनविभागाचे सहायक वनरक्षक प्रकाश बागेवाडे व कुडाळचे वनक्षेत्रपाल संजय कदम हे आंबेरी येथील वनतळावर या मोहिमेदरम्यान, १७ तास ठाण मांडून होते.


अभिमन्यू टीम लीडर
या मोहिमेत कर्नाटक येथून दाखल झालेल्या चार प्रशिक्षित हत्तींमध्ये अभिमन्यू हा हत्ती टीम लीडर म्हणून काम करत आहे; तर अर्जुन, गजेंद्र व हरिश (हर्षा) यांचा समावेश आहे. ही पकड मोहीम डॉ. उमाशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्यांना सहायक म्हणून व्यंकटेश, करमभैय्या, रमेश व दोडापक्षी काम करत आहेत. सोबत २५ जणांची मोठी टीमही आहे. ही पूर्ण टीम कर्नाटक सरकारच्या वनखात्याची आहे.

मोहिमेचे श्रेय सर्व टीमचे
या मोहिमेनंतर पथकाचे प्रमुख आणि नामांकित डॉक्टर उमाशंकर यांनी बोलताना सांगितले की, हत्ती पकडण्यात मोहिमेच्या पहिल्याच दिवशी यश मिळाल्याचा आनंद आहे. मात्र, हे कोण्या एकाचे श्रेय नसून यासाठी संपूर्ण टीमने मेहनत घेतली. आपले सहकारी व्यंकटेश याने या मोहिमेत इतर सहकाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वी झालो. ईश्वराच्या कृपेने व टीमच्या सहकार्यामुळे या हत्तीला जेरबंद करण्यास यशस्वी ठरलो.

२0४ अधिकारी, कर्मचारी सहभागी
या मोहिमेत वनविभागाचे कोल्हापूर विभागाअंतर्गतचे सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुुदुर्ग, रत्नागिरीमधील तब्बल २0४ कर्मचारी सहभागी झाले होते. या सर्व कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत १७ तास अथक मेहनत घेतली. यात प्रत्यक्षात स्पॉटवर हत्ती पकडण्यासाठी गेलेल्या मोहिमेतील कर्मचारी आणि कर्नाटक येथून आलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांनी केवळ दुपारचे भोजन घेतले होते. मात्र, या सर्वांना मंगळवारी पहाटे ३ वाजेपर्यंत केवळ पाण्याव्यतिरिक्त काहीच घेता आले नाही.

आणखी दोन हत्ती पकडण्याचे आव्हान
माणगाव खोऱ्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशत माजविणाऱ्या तीन हत्तींची टोळी येथे कार्यरत आहे. यात दोन नर आणि एका मादीचा सहभाग आहे. आता सोमवारी रात्री एका नराला पकडले आहे, तर एक नर आणि मादी अजूनही जंगलात गायब आहेत. त्यामुळे या नर आणि मादीला पकडण्याची मोठी जबाबदारी या पथकावर आहे. दहा दिवसांची पकड मोहीम आहे. मात्र, पहिल्याच दिवशी अथक प्रयत्नाने एका हत्तीला पकडण्यात आल्यामुळे अजूनही आठ दिवसांचा कालावधी आहे.

क्रॉलमध्ये डांबण्यासाठी एक तासाचा अवधी
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या हत्तीला रात्री २.३0 वाजता आंबेरी येथील तळावर आणले. त्यानंतर अर्ध्या तासामध्ये प्रशिक्षित हत्ती अभिमन्यू याने त्याला वनविभागाने तयार केलेल्या पिंजऱ्यात म्हणजे क्रॉलमध्ये डांबले. त्यानंतर अभिमन्यू आणि हर्षच्या मदतीने या जंगली हत्तीला लाकडी क्रॉलमध्ये बंदिस्त करण्यात आले.


हत्तीचे वय सुमारे ४0 वर्षे
नानेलीच्या जंगलात डॉट मारून क्रॉलमध्ये बंदिस्त केलेल्या रानटी हत्तीचे वय सुमारे ४0 वर्षे असल्याचे डॉ. उमाशंकर यांनी सांगितले. या हत्तीला प्रशिक्षणासाठी क्रॉलमध्ये सुमारे दोन महिने ते सहा महिने ठेवण्यात येणार आहे.

आँखो देखा हाल
1 सोमवारी सकाळी ८ पासून पकड मोहिमेची तयारी सुरू
2 सकाळी १0 वाजता नानेली डोंगरात प्रशिक्षित हत्तींसह शोधमोहिमेसाठी प्रवेश.
3सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत नानेली येथील जंगलात चारही पाळीव हत्तींकडून शोधमोहीम.
4दरम्यान, याच काळात या रानटी हत्तींकडून पथकाला हुलकावणी.
5दुपारी ४ च्या सुमारास नानेली ढेपगाळू परिसरात ग्रामस्थ बापू बागवे यांनी दोन रानटी हत्ती पाहिल्याची माहिती दिली.
6ढेपगाळू परिसरात डॉ. उमाशंकर आणि प्रशिक्षित हत्तींच्या टीमने सायंकाळी ५ वाजता दोन्ही रानटी हत्तींना घेराव घातला.
7लगेचच व्यंकटेश या माहुताकडून हत्तीवर इंजेक्शनचा डॉट.
8त्याचवेळी वनविभागाचे राखीव पथक तसेच जे.सी.बी., पाण्याचा टँकर घटनास्थळी दाखल.
9वनकर्मचारी पाण्याने भरलेले कॅन जंगलात घेऊन गेले.
10साधारणपणे तासाभराच्या कालावधीने ६ वाजता पाणी घेऊन गेलेले सर्व कर्मचारी माघारी.
11मात्र, डॉक्टर उमाशंकर, व्यंकटेश आणि प्रशिक्षित हत्तींचे पथक याच दरम्यान जंगलात.
12डॉट मारल्यानंतर दोन्ही हत्ती जंगलात गायब.
13डॉट मारलेल्या हत्तीपर्यंत पोहोचत डॉ. उमाशंकर मात्र जंगलातच.
14उमाशंकर काही काळ संपर्क क्षेत्राबाहेर.
15७.३0 वाजण्याच्या दरम्यान आंबेरी येथे तळावर गेलेले राखीव पथक पुन्हा नानेली जंगलाच्या दिशेने.
16रात्री ८ ते रात्री १0 सर्वत्र सामसूम, मात्र जंगलात पकड मोहीम सुरूच.
17रात्री १0 नंतर हत्ती पथकाच्या ताब्यात.
18रात्री १0 ते पहाटे २.३0 हत्तीला आंबेरी येथे क्रॉलवर नेण्यात यश.
19रात्री २.३0 ते ३.३0 रानटी हत्ती क्रॉलमध्ये बंदिस्त.
20उपवनसंरक्षकांसह सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास.

Web Title: After seventeen hours campaign campaign - Uma Shankar's strategy is successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.